रत्नागिरी :- तीव्र उन्हाबरोबरच अचानक निर्माण होणार्या ढगाळ वातावरणाचा परिणाम सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेणार्या आंबा बागायतदारांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सेंद्रीय उत्पादक म्हणून शासनाने प्रमाणित केले असल्याने झाडांवर रासायनिक औषधांची फवारणी करता येत नाही. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे.यंदा प्रतिकुल परिस्थितीत आंबा बागायतदारांनी मोहराचे संवर्धन केले. पण वातावरणीय चढ-उतारामुळे फळाच्या परिपक्वतेवर परिणाम होत आहे. सेंद्रीय आंबा हा 60 ते 70 टक्के परिपक्व झाल्यावर तोडणी करतात. त्यामुळे साका होत नाही. हाच आंबा नैसर्गिक पध्दतीने पेंढ्यामध्ये ठेवून पिकविला तर चार दिवसांत पिवळसर होतो. पुढील पाच दिवसांत तो पिकतो. सध्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तुडतुडासह फळमाशी दिसू लागली आहे. पेंढ्यात आंबा ठेवला तर अतिउष्णतेमुळे साका आढळतो. सेंद्रिय शेतकर्यांना रासायनिक औषधांची फवारणी किंवा रायफलिंग चेंबरची प्रक्रियाही सेंद्रिय प्रमाणीकरण झालेले आहे. त्यामुळे बागायतदार यंदा दुहेरी अडचणीत सापडला आहे. अति उष्णतेमुळे हिरवी पाने करपून गळून पडत आहेत. त्यामुळे उष्णतेचा फटका हा लहान मोठ्या तयार होणार्या फळांनाही बसून असून ते अवेळी परिपक्व होत आहेत.
यंदा हंगामात सेंद्रिय आंबा उत्पादकांना तुडतुडा या रोगाचा फारसा त्रास झाला नाही. थ्रिप्सचा त्रास सहन करावा लागत आहे. थ्रिप्स हा दोन टप्प्यांमध्ये झाला होता. सुरूवातीच्या मोहोराच्या ते बारीक आंब्याच्या मध्ये हा आजार होऊन, पहिला मोहोर काळा सुकून गेला, तर बारीक कैरी गळून गेली. त्यामुळे पहिल्या हंगामाचे नुकसान झाले. शिवाय त्यातून वाचलेल्या मोठ्या तयार होणार्या कैर्यांवरही फळमाशीचा प्रादुर्भाव होऊन, आंबा काळसर होऊन गळून पडत आहे. तोडणीची प्रक्रियाही चार दिवसांवरून बारा दिवसांपर्यंत गेली आहे. सेंद्रीय आंब्याला मागणी असूनही उत्पादन व पुरवठा यांचा मेळ शेतकर्यांना घालताना दमछाक होत आहे. शिवाय हंगामी पिक असल्याने, आर्थिक नुकसानही होत आहे.
सेंद्रीय पध्दतीने आंबा पिकविण्यासाठी झाडावरून तोडणी केल्यावर त्याचे तापमान कमी झाले, तर तो पेंढ्यात जास्तीत जास्त तीन थर लावून, सर्व थर बारदानाने झाकून घ्यावेत. त्यात उष्णता व तापमान योग्य राखले जाईल आणि आंबा नैसर्गिक पध्दतीने तयार होईल. उष्णतेमुळे पाने करपणे, फळे गळणे याकरिता संपूर्ण झाडावर पाने व फळांसहीत 10 टक्के प्रभावी चुन्याचे पाणी व्यवस्थित फवारावे. लहान फळे असणार्या झाडांना पाणी द्यावे. त्यामुळे अतिनिल सुर्यकिरणांपासून व बाष्पीभवनाची प्रक्रिया नैसर्गिक पध्दतीने रोखून, फळगळतीही रोखली जाऊ शकते. फळमाशीला रोखण्यासाठी सापळे लावावेत, अशा सुचना शेती अभ्यासक संदीप कांबळे यांनी केल्या आहेत.