रत्नागिरी :- पावसापुर्वी रस्त्यांची दुरूस्ती तसेच गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कोकणात येणार्या चाकरमाण्यांचा विचार करून महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी. कशेडी ते सावंतवाडी या दरम्यानच्या महामार्गावर एकही खड्डा पडणार नाही किंवा राहणार नाही याची तरतूद मे महिन्यातच करा, अशी ताकीद संबधितांना यंत्रणांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
उदय सामंत म्हणाले, कोकणात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे दरवर्षी मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गाची दुरावस्था होते. यावेळी कंपन्यांनी आदीच खबरदारी घेऊन भविष्यात ही वेळ येऊ नये, याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी कनेक्टीव्हीटी ब्रेक होते, घाट तसेच ज्याठिकाणी स्लोप आहे, त्याठिकाणचे कामं लवकरात लवकर पूर्ण करा. महामार्ग दरम्यान शास्त्री, वाशिष्ठी आदी नद्यांवर येणार्या पूलाच्या कामाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. ब्रिजच्या कामासाठी साहित्य वाहतूकीस अडचण येत असल्यास वाहतूक परवानंगीसाठी प्रशासनाची मदत घ्या. पूलांचे काम पावसाळापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी संबधितांना दिल्या. येथील अल्पबचत सभागृहात आयोजित रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यांतर्गत असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. चौपदरीकरण कामाचा या दरम्यान कंपनीनिहाय आढावा घेतला. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी, राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी, विलास चाळके, सचिन कदम तसेच चौपदरीकरणाचे काम करणार्या कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.