धनंजय कीरांचे इंग्रजी चरित्र ई-स्वरूपात प्रसिद्ध होणार

रत्नागिरी:- महान भारतीय नेत्यांची इंग्रजी आणि मराठी चरित्रे लिहून प्रसिद्धी पावलेले चरित्रकार धनंजय कीर यांचे इंग्रजी चरित्र वाचकांच्या भेटीला येत आहे. सर्व व्यवहार ठप्प करणाऱ्या ‘कोरोना’ आणि ‘लॉकडाउन’च्या बिकट परिस्थितीत या पुस्तकाची ऑनलाईन आवृत्ती पद्मभूषण कीर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १२ मे रोजी प्रकाशित होत आहे. हा प्रकाशन सोहळादेखील ‘ऑनलाईन’ पद्धतीने पार पडेल, अशी माहिती या चरित्राचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार राजेन्द्रप्रसाद मसुरकर यांनी ‘ई-पत्रका’द्वारे दिली. ‘धनंजय कीर- लाईफ स्केच ऑफ ए ग्रेट बायॉग्राफर’ असे या चरित्राचे शीर्षक असेल.

२३ एप्रिल रोजी येणाऱ्या धनंजय कीर जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी ‘ई-संवाद’ साधला. रत्नागिरीचे चरित्रकार सुपुत्र धनंजय कीर यांचे मराठी चरित्र राजेन्द्रप्रसाद मसुरकर यांनीच लिहिले आहे. ते २०११ मध्ये प्रकाशित झाले. वीस प्रकरणांतून कीरांचे जीवनदर्शन घडविणाऱ्या या पुस्तकाला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला, त्याच्या सव्वादोनशे प्रती राष्ट्रीय पातळीवरील ‘राजा राममोहन प्रतिष्ठान’अंतर्गत योजनेतून शासनाने खरेदी केल्या. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचा मराठी अनुवादही ‘पॉप्युलर प्रकाशना’साठी मसुरकर यांनी केला.मराठी चरित्र कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी विधिमंडळ सचिव भास्करराव शेट्ये, नाटककार प्र. ल. मयेकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित झाले, त्यावेळी केलेल्या भाषणात, इंग्रजी भाषेत कीर चरित्र लिहावे अशी सूचना प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी केली. तिचा विचार करून या महान लेखकाचे जीवनकार्य अमराठी वाचकांना समजावे यासाठी आपण आता हे इंग्रजी चरित्र लिहिल्याचे मसुरकर यांनी सांगितले. मूळ मराठी पुस्तकाचे हे भाषांतर नाही, तेरा प्रकरणाचे हे स्वतंत्र चरित्र आहे असेही त्यांनी सांगितले. दोन्ही भाषांमध्ये अनेक चरित्रे लिहिणाऱ्या आपल्या वडिलांचेही त्या दोन भाषांमध्ये चरित्र उपलब्ध होत आहे, याबद्दल धनंजय कीर यांचे रत्नागिरीनिवासी सुपुत्र डॉ. सुनीत कीर यांनी आनंद व्यक्त केला आहे.