जिल्ह्याची ग्रीन झोनकडे वाटचाल – ना. सामंत

रत्नागिरी :- जिल्ह्यामध्ये परदेशातून आलेल्या 1 हजार 119 व्यक्‍तिंना होमक्‍वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. कोरोना बाधित सहा पैकी एकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण बरे झाले आहे तर तिघांवर उपचार सुरु आहेत. संस्थात्मक क्‍वारंटाईन केलेल्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. बर्‍या होणार्‍या रुग्णांना एकूण 28 दिवस क्‍वॉरंटाईनमध्ये ठेवले जाणार असून, रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोनच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले.

जिल्ह्यात सोशल डिस्टंगसिंगचा वापर होत नसेल तर ही चुकीची गोष्ट आहे. नियमांची पायमल्‍ली करणार्‍यांवर कारवाई करा अशा सूचना आपण पोलीस अधीक्षकांना दिल्या असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोनकडे जावा यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी त्याला सहकार्य केले पाहिजे. जिल्ह्यातील 99 टक्के जनता घरामध्ये बसून सहकार्य करीत आहेत. मात्र एक टक्‍का लोक नियमांची पायमल्‍ली करीत आहेत. त्यांना योग्य धडा शिकवला जाईल असेही त्यांनी सांगितले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई करा असेही आपण सांगितले असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.