रत्नागिरी:- राज्यस्तरावर जाहीर झालेल्या आकडेवारीत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधित आठ रुग्ण दाखवले गेल्याने एकच गोंधळ उडाला. परंतु वाढलेल्या रुग्णसंख्येबाबतचा घोळ मिटला आहे. मुंबईतील चाकरमानी रहिवाशांनी रत्नागिरीतील मूळ पत्ता नोंदवल्याने जिल्ह्याच्या कोरोना बधितांमध्ये दोन रुग्णांची वाढ झाली होती.जिल्ह्याचा नेमका आकडा 6 पॉझिटिव्ह असल्याचे अंतिम झाले आहे.
मुंबईतील कांदिवली वेस्ट भागात राहणारी एक 26 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. प्रत्यक्षात ती 2 वर्षापासून तेथे राहत असली तरी नाव नोंदवताना मुळ पत्ता देवरुख संगमेश्वर असा नोंदला आहे. तर २४ वर्षीय तरुण रमाबाई आंबेडकर नगर वरळी येथे 10 वर्षापासून राहतो. तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला त्याचा मुळ पत्ता रत्नागिरी जवळील फुणगुस गावचा नोंदला आहे.या दोन नावांमुळे राज्यस्तरावर जारी आकडेवारीत रत्नागिरीचा आकडा 8 पॉझिटिव्ह दाखवला गेला होता. याबाबतची अधिकृत आकडेवारी बुधवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली असून रत्नागिरी जिल्हयात कोरोना बाधितांचा अधिकृत आकडा 6 असाच आहे.