रत्नागिरी:– जिल्ह्यामध्ये सहा कोरोनाबाधित सापडले होते. त्यातील खेड येथील एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण बरे झाले आहेत. त्यातील एकाला घरी सोडण्यात आले आहे. तर राजिवडा येथील एकाला एमआयडीसी येथे 14 दिवस क्वॉरंटाईन केले जाणार आहे. साखरतर येथील तिघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. दोन महिलांचे अहवाल एका दिवसात प्राप्त होतील तर छोट्या बालकाचे नमुने दोन दिवसात पाठवले जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात संस्थात्मक क्वॉरंटाईन केलेल्यांची संख्या 33 आहे. यात जिल्हा रुग्णालयात 25, कळंबणी येथे 2, संगमेश्वर येथे 4 तर दापोलीत 2 रुग्णांचा समावेश आहे. संस्थात्मक क्वारंटाईनचा कालावधी 28 दिवसाचा केला जाणार आहे.
जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 1119 जणांना होमक्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. यातील 750पेक्षा अधिक जणांना चौदा दिवसाचा कालावधीपूर्ण झालेला आहे. उर्वरीतांचा तीनचार दिवसात पूर्ण होणार आहे. कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन केले तरच रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाईल असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.