वीज पुरवठा तातडीने सुरू करण्याची गाव विकास समिती संगमेश्वर कार्याध्यक्ष अमित गमरे यांची मागणी
संगमेश्वर:- तालुक्यातील पिरंदवने गावातील भाटले वाडी,निवई वाडी,बौध्द वाडी या 3 वाड्या मागील 2 दिवसांपासून अंधारात असून वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिक हैराण आहेत.एकीकडे लॉक डाऊन मुळे नागरिक घरीच असताना वीज पुरवठा अद्याप सुरळीत न झाल्याने वाढत्या उकाड्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत, या भागाचा वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यात यावा अशी मागणी गाव विकास समितीचे संगमेश्वर कार्याध्यक्ष अमित गमरे यांनी केली आहे.
रविवारी वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे येथील विजेचा खांब कलंडला होता.परिणामी या भागातील तीन वाड्यांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.लॉक डाऊन असल्याने येथील नागरिकांनी फोन द्वारे याबाबतची तक्रार दिल्या नंतर ही अद्याप येथील वीज वितरण व्यवस्थेची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.रविवार पासून येथील जवळपास 90 कुटुंब अंधारात आहेत.याकडे महावितरण च्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे असे गाव विकास समितीचे संगमेश्वर कार्याध्यक्ष अमित गमरे यांनी म्हटले आहे.वीज ही अत्यावश्यक सेवा असून विजे अभावी येथील नागरिकांचे हाल होत आहेत.रविवार आणि सोमवार ची रात्र येथील नागरिकांनी अंधारात काढली आहे,प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन येथील विजेच्या समस्येवर उपाययोजना करावी अशी मागणी अमित गमरे यांनी केली आहे.