लॉकडाउन काळात मध्यवर्ती वितरण प्रणालीमार्फत मोफत धान्य वाटप

रत्नागिरी :- लॉकडाउनमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासन,दानशूर व्यक्ती,सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मध्यवर्ती वितरण प्रणालीच्या माध्यमातून मोफत शिधा वाटप करण्यात येणार आहे. यामुळे लॉकडाउनच्या नियमांचेही पालन करण्यास मदत होणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिधा वाटप करताना लोकडाउन कालावधीमध्ये कोणत्याही संस्थेच्या सदस्यांना किंवा प्रतिनिधींना, नागरिकांना मोफत वस्तू वाटपाचे कारण देवून सारखे सारखे घराबाहेर पडावे लागू नये. सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचा भंग होवू नये, या सर्व गोष्टींमुळे  हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण कमी  होण्यास मदत होणार आहे. किराणा मालाचे मोफत वाटप मध्यवर्ती वितरण प्रणालीच्या माध्यमातून केल्याने दानशूर व्यक्ती , संस्था  लोकप्रतिनिधी फायदा होणार आहे. कारण यामुळे गरजूंची यादी लवकर तयार होवून गरजूंना लवकरात लवकर मदत मिळू शकते. सर्वच संस्था , व्यक्ती यांनी एकत्र येवून काम केल्यामुळे नेमकी कोणाला गरज आहे , कोण गरजू आहे याची पडताळणी करणे सोपे जाईल. सर्वच संस्था, व्यक्ती आपापल्यापरीने किराणा मालाचे मोफत वाटप करताना दिसत आहेत. त्यामुळे काही व्यक्ती या गोष्टीचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून एकत्र येऊन वाटप केल्यास अशा वृत्तीच्या व्यक्तींना ओळखता येईल आणि आपल्याला गरजुंनाच सेवा दिल्याचे समाधान मिळेल . 
  गरजू कुटुंबांची किंवा व्यक्तींची संपूर्ण पडताळणी करूनच  मोफत किराणा माल दिला जाईल याची खबरदारी घेतली जाईल. एकाच गरजू कुटुंबाला किंवा गरजू व्यक्तीला दोन दोन वेळा किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळा मोफत किराणा माल दिला जाणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. जीवनावश्यक किराणा माल सगळीकडे सारखाच वाटप केला जाईल, त्यामुळे भेदभावाची भावना निर्माण होणार नसल्याचेही मुंढे यांनी यावेळी सांगितले.