मासेमारीवर राहणार प्रशासनाची करडी नजर

रत्नागिरी:- लॉकडाऊन मधुन शिथिलता मिळाली असली तरी मासेमारी व्यवसायावर प्रशासनाची बारीक नजर असणार आहे. मासळी उतरविण्याच्या केंद्रावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापित करून या ठिकाणी नोडल अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. परवानाधारक मासेमारी नौकांना त्यांच्या परवान्यानुसार निश्चित केलेल्या बंदर किंवा केंद्रातुनच मासेमारीस जाण्यास व त्याच बंदरात मासेमारी करून परत येण्यास परवानगी दिली जाणार आहे.

केंद्र शासनाचे मत्स्यव्यवसाय विभागाने सागरी मासेमारी तसेच मत्स्यसंवर्धन उद्योग क्षेत्र व या क्षेत्राशी निगडित पूरक व्यवसायास लॉकडाऊनमधून सुट दिलेली आहे. मासेमारी बंदी कालावधीचे काटेकोरपणे पालन आणि त्याअनुषंगाने केंद्र व राज्यशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आदर्श कार्यप्रणालीची काटेकोरपणे अंमलबजावणी जिल्हा प्रशासन तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयामार्फत केले जाणार आहे. समुद्रात मासेमारीवेळी मच्छिमार, खलाशी यांनी आपत्कालीन मदतीची मागणी केल्यास त्यांना मदत पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय यांनी स्वतः संबंधित भारतीय तटरक्षक दल व सागरी सुरक्षा यंत्रणेशी समन्वय साधावा.

मासेमारी नौका मासेमारीसाठी जाण्यापुर्वी आणि मासळी उतरवताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मच्छिमारांच्या मदतीसाठी तसेच समुद्रात मासेमारीवेळी मच्छिमार किंवा खलाशी यांनी आपत्कालीन मदतीची मागणी केल्यास त्यांस मदत पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय यांनी स्वतः संबंधित भारतीय तटरक्षक दल व सागरी सुरक्षा यंत्रणेशी समन्वय साधावा अशा सुचना दिल्या आहेत. सागरी मासेमारीच्या समग्र समन्वयासाठी, देखरेखीसाठी आणि सुलभ अंमलबजावणीसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात यावी. या समितीत संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, मच्छीमार सहकारी संस्था किंवा नौका मालक व खलाशी संघटना यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. मासेमारी बंदरे किंवा मासळी उतरविण्याच्या केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय हे विशेष यंत्रणा स्थापित करावा. मासळी उतरविण्याच्या केंद्रावर देखरेख ठेवण्यासाठी कक्ष स्थापित करून त्याचे नोडल अधिकारी नियुक्त करावेत. परवानाधारक मासेमारी नौकांना त्यांच्या परवान्यानुसार निश्चित केलेले बंदर किंवा केंद्रातुनच मासेमारीस जाण्यास व त्याच बंदरात मासेमारी करून परत येण्यास परवानगी दिली जाणार आहे. हा कक्ष आठवड्याच्या सातही दिवस 24 तास सरु ठेवावा. जिल्हाप्रशासनाने स्थानिक मच्छीमार संस्था यांच्याशी विचारविनिमय करुन मासेमारीचा आराखडा तयार करावा जेणेकरून मासेमारी नौकांवर योग्य देखरेख व नियंत्रण ठेवता येईल. मासेमारी दरम्यान एखाद्या मासेमारी करणार्‍या नौकेतील खलाशाला ताप , खोकला , अंगदुखी , डोकेदुखी , धाप लागणे , सर्दी , घसा खवखवणे इ . सारखी लक्षणे आढळून आल्यास नौकेचा तांडेल यांची जबाबदारी राहील.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी. त्यात संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, मच्छीमार सहकारी संस्था किंवा नौका मालक व खलाशी संघटना यांचे प्रतिनिधींचा समावेश करावा. मत्स्यव्यवसाय विभागामाफत तांडेल, खलाशांची वैद्यकीय तपासणीची माहिती सतत घ्यावी. नौकेवरील खलाशी, कर्मचारी यांचे आवागमन त्याच जिल्ह्यात सीमित राहील असे पहावे. पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या ठिकाणाहुन खलाशी आल्यास त्यांच्यामार्फत रोगाचा प्रादुर्भाव होवू शकतो व ते टाळणे आवश्यक आहे. ज्या मासेमारी नौकांना व खलाशांना समुद्रात मासेमारीस जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे त्या नौकांवर कागदपत्रे ठेवणे आवश्यक आहे. खलाशांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईकांचा तपशील देणे आवश्यक असून स्मार्टफोन असल्यास आरोग्य सेतू हे अ‍ॅप डाऊनलोड करून घेणे गरजेचे आहे. मासेमारी नौकेवर नौकामालकाने पुरेश्याप्रमाणात हॅण्डवॉश , सॅनिटायझर , साबण , फेस मास्क उपलब्ध करणे आवश्यक आहे . सर्व नौका मालकांकडून याबाबतची पुर्तता होते किंवा नाही याची खात्री विभागामाफत करण्यात यावी. नौकेच्या अवागमनाचा तपशील नोंदवहीमध्ये घेऊन व याबाबतची नोंद देखरेख कक्षामधील नोंदवहीत ठेवण्यात यावी अशा सुचना दिलेल्या आहेत.