अवकाळी पावसाचा दणका; शंभरपेक्षा अधिक घरांचे नुकसान

रत्नागिरी :- अचानक पडलेल्या वळवाचा वादळी पाऊस आणि गारपिट यामुळे संगमेश्‍वरसह दापोली तालुक्याला फटका बसला. हर्णैै येथील 45 घरांचे तर संगमेश्‍वरातील सुमारे साठहून अधिक घरांचे पाच लाख रुपयांच्या नुकसानीची नोंद झाली आहे.

वाढत्या उष्म्यामुळे रविवारी (ता. 19) अचानक वादळी पाऊस आणि गारा पडल्या. अनेक घरांवर झाडे पडली तर घरांचे छपरे उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. 700 रुपयांपासून ते अगदी 25 हजार रुपयांपर्यंतचे नुकसान नोंदले गेले आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील ओझरे, कोळंबे, निधाळेवाडी, ओझरखोल, कासारकोळवण, कडवई, कोंड्ये, असुर्डे, कुंभारखणी, वाजुळे बुद्रुक या गावातील सुमारे साठहून अधिक लोकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक कोंडगाव येथील लोकांना बसला आहे. सुमारे वीसहून अधिक लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागात झाली आहे. त्यांचे पंचनामे झाले असून तत्काळ मदतीची अपेक्षा आहे.