राज्यात प्रथमच जिल्ह्यात अंमलबजावणी
रत्नागिरी:- राष्ट्रीय संकटात उल्लेखनीय काम करणार्या जिल्ह्यातील आशा अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व ए.एन.एम. नर्स यांना सलग ३ महिने प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. या काळात पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा व महसूल विभाग यांच्यासोबतच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व ए. एन. एम. नर्स यांनी या कार्यात झोकून देत काम केले. त्यातील पोलीस, आरोग्य यंत्रणा व महसूल विभाग यांना शासनाने विमा कवच दिले होते. मात्र हे ३ घटक तुटपुंज्या पगारावर काम करतायत.
दुर्लक्षित राहिलेल्या घटकाचा विचार करुन या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली. जिल्ह्यात २६८० अंगणवाडी सेविका, १२८५ आशा वर्कर्स व ३७८ ए. एन. एम. नर्सेस काम करतायत. त्यांना सलग ३ महिने ५०० रु. प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. दर महिन्याला १३ लाख ६२ हजार रु. अतिरिक्त खर्च जिल्हा परिषद उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, आरोग्य सभापती बाबू म्हाप आदी उपस्थित होते. सलग ३ महिने प्रोत्साहनपर भत्ता देणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
दरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जिल्ह्यातून चांगलीच मदत होत आहे. शिवसेना पक्षातर्फे जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून १ कोटी रु. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ कोटी रु. अशी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला करणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.