जिल्ह्यातील 27 तपासणी अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी :- राजिवडा भागात आढळलेल्या आणि पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णाचा दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. सलग दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने राजीवड्यातील रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. साखरतर मधील दोघांचे नमुने मिरजला पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सकाळी प्राप्त होण्याची शक्यता आहे.
सोमवारी जिल्हा रुग्णालयात 27 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले. यामध्ये कळंबणी येथील सहा दापोली येथील सहा आणि जिल्हा सामान्य रुग्णालय येथील 15 असे एकूण 27 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे या 27 अहवालात राजीवडा येथील कोरोनाग्रस्त रुग्णाचा सलग दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे.
सलग दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने राजीवडा येथील रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. याआधी गुहागर शृंगारतळी येथील रुग्ण कोरोनामुक्त झाला होता. कोरोनामुक्त झाल्यानन्तरही पुढील काही दिवस राजीवडा येथील रुग्णावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष असणार आहे. पुढील चौदा दिवस या रुग्णाला होम क्वारंटाईन किंवा हॉस्पिटल मध्येच क्वारंटाईन करण्यात येणार असून याबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान रत्नागिरीत अद्याप साखरतर येथील तीन कोरोना रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये दोन महिला आणि एका सहा महिन्यांच्या बच्चूचा समावेश आहे. यापैकी दोघांचे अहवाल तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले असून याचे रिपोर्ट मंगळवारी सकळपर्यंत अपेक्षित आहेत.