मास्कशिवाय फिराल, रस्त्यावर थुंकाल तर बसणार दंड

रत्नागिरी :- लॉकडाऊन मधील काही सवलती सोमवार पासून जिल्हयात लागू झाल्या. कारणाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. बाहेर पडताना मास्क आवश्यक असून मास्क शिवाय कुणी आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय रस्त्यावर थुंकणाऱ्यावर देखील कारवाई होणार आहे.जिल्हयात मास्क घालणे सर्वांना सक्तीचे करण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय आढळलेल्या व्यक्तीला दंड करण्यात येत आहे. रस्त्यांवर व कोणत्याही ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचे उल्लघंन झाल्यास त्यांनाही दंड करण्यात येणार आहे. मिरज येथून 27 अहवाल प्राप्त झाले. यात कळंबणी 6, दापोली 6 आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील  15 अहवाल आहेत. राजिवडा येथे सापडलेल्या पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याचे यात स्पष्ट झाले आहे. जिल्हयात तपासणीसाठी 419 नमुने घेण्यात आले होते. यापैकी 6 अहवाल पॉसिटीव्ह तर 396 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. केवळ 15 अहवाल येणे बाकी आहे. जिल्हयात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची एकूण संख्या 1 हजार 117  आहे तर संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या  359  आहे.