माजी आमदार बाळ माने यांच्या प्रयत्नांना आले यश; आंब्यासाठी रेल्वेने दिला मदतीचा हात

रत्नागिरी :- एकीकडे आंबा वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात माल वाहतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेच्या माध्यमातून आंबा वाहतुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून आता कोकण रेल्वेच्या पार्सल व्हॅन मधून रत्नागिरीतून 900 किमी अंतरावरील अहमदाबाद येथे आता आंबा जाणार आहे. पहिल्या फेरीमध्ये सध्या सुमारे दोन हजार पेट्या आंबा यातून जाणार आहे.

याबाबतची माहिती देताना बाळ माने म्हणाले की सध्या कोरोनाचे सर्वात मोठे संकट सर्व जगावर असताना कोकणातील आंबा हा नाशिवंत पीक यातून सुटलेले नाही. कोकणातील हजारो बागायतदार सध्या मोठ्या विवंचनेत असून बागेत तयार झालेला आंबा कोणत्या पद्धतीने बाजारपेठेत पोहोचवायचा यासह अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. यावर मात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाचे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता यांना यांच्याकडे हा विषय मांडल्या नंतर त्यांनीही कोकण रेल्वे च्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याची तयारी दर्शवली. यासाठी कोकण रेल्वेची पार्सल व्हॅन सोडण्यात येणार असून पहिल्या फेरीमध्ये 2 व्हॅन जाणार आहे.

यामध्ये एका व्हॅनमध्ये साधारण 20 किलोची एक पेटी याप्रमाणे 1000 पेट्या भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे 2 व्हॅन मधून 2000 पेट्या भरून आंबा अहमदाबादला जाणार आहे असे बाळ माने यांनी सांगितले. यासाठी वाहतूक खर्च सुद्धा अत्यंत नाममात्र असल्याचे ते म्हणाले. यामध्ये एका पेटीमागे रेलवे केवळ 55 रुपये इतके नाममात्र भाडे आकारात असून रत्नागिरी आणि अहमदाबाद येथे माल चढ – उताराचे किमान 20 रुपये प्रतीपेटी इतका खर्च येणार आहे. ट्रक मधून हा आंबा गेल्यास सध्या प्रती पेटी 250 रुपये इतका खर्च शेतकऱ्याला येत आहे. त्यामुळे रेल्वेने पाठविल्यास प्रति पेटी 150 रुपये इतकी शेतकऱ्यांची बचत होणार आहे.

ही रेल्वे पार्सल व्हॅन सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांसाठी सुद्धा उपलब्ध करून देता येऊ शकणार असून वेंगुर्ल्यातील बागायतदार, उत्पादकांसाठी कुडाळ आणि सावंतवाडी स्थानके तर देवगडच्या बागायतदारांसाठी नांदगाव स्थानकाजवळ ही व्हॅन थांबू शकेल. यात रेल्वे शुल्कात किरकोळ वाढ अपेक्षित आहे. मात्र रत्नागिरीतून अवघ्या 15 तासात आंबा अहमदाबाद येथे पोहोचणार आहे. त्याच वेळी या व्हॅनला योग्य व्हेंटिलेशन असल्याने आंबा 15 तासाच्या प्रवासात योग्य पद्धतीने टिकून राहणार असून यामुळे आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे असे श्री माने यांनी सांगितले.

सध्या 2 पार्सल व्हॅन जाणार असून मागणी वाढल्यास एकावेळी 8 रेल्वे पार्सल व्हॅन जोडता येणार असल्याने एका वेळी रेल्वेतून 8000 हजार पेट्या जाऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी केंद्रीय मंत्री गोयल, माजी मंत्री प्रभू यांच्यासह खा. नारायण राणे आणि माजी खा. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा बागायतदारांना न्याय देता आला असेही श्री.माने यांनी आवर्जुन सांगितले.