रत्नागिरी :- कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. शनिवारी मासेमारीसाठी मिरकरवाडा बंदरातून रवाना झालेल्या मच्छीमारांना बांगडा, गेदरसह कोळंबीचा उतारा मिळाला आहे; मात्र बंदरात परतणार्या नौकांना सायंकाळी 6 वाजल्यानंतर मासळी उतरवता आली. गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याची मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.
कोरोनाचे संकट आल्याने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या लॉकडाऊनची मुदत केंद्र सरकारने वाढवल्याने तब्बल एक महिना अधिक काळ मासेमारी ठप्प राहिली होती. या कालावधीत केंद्राने मच्छीमारांना दिलासा देणारा निर्णय घेतला. नियम आणि अटींच्या आधारावर मासेमारीला परवानगी देण्यात आली. केंद्राने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मच्छीमारांनी तयारी सुरू केली. नियम आणि अटींच्या आधारावर मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मासेमारी सुरु झाल्यामुळे बंदरावर गर्दी होऊ नये म्हणून फक्त मच्छिमारीशी निगडित लोकांना बंदरावर प्रवेश दिला जाणार आहे. एकावेळी केवळ चार नौका मासळी उतरवण्यासाठी बंदरात आणल्या जात आहे. यासाठी मिरकरवाडा बंदरावर दोन जेट्टी रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा अनेक नौका मासेमारीसाठी झोपावल्या आहेत. मासेमारी करुन त्या परतल्या असून मासे उतरवण्यासाठी किनार्यापासून काही अंतरावर प्रतिक्षे आहेत. दिवसा मासळी उतरवण्यास सुरवात केली, तर मोठ्याप्रमाणात गर्दी होऊ शकते. ते टाळण्यासाठी मत्स्य विभागाकडून नियम घालून देण्यात आले आहेत. मासेमारीसाठी गेलेल्या नौकांपैकी काहींना 50 ते 60 किलो चालू कोळंबी मिळत आहे. त्याचा दर किलोला अडीचशे रुपयांपर्यंत मिळतो. मोठ्या नौकांना बांगडा, गेदर, काप यासह विविध प्रकारची मासळी मिळत आहे. दहा ते पंधरा टप मासे एका नौकेला मिळत आहेत; मात्र या माशांना दर किती मिळणार याकडे मच्छीमारांचे लक्ष लागले आहे. मासे उतरवल्यानंतर व्यावसायिक ते खरेदी करतात.
मिरकरवाडा बंदरातील सुमारे चाळीस टक्के नौका मासेमारीला गेल्या असाव्यात असा अंदाज आहे. उर्वरित नौकाही मासेमारीसाठी जाण्याची शक्यता आहे. बर्फ, पाणी आणि इंधन भरुन त्या मासेमारीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे.