सैतवडे:- रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथे गुम्बद मोहल्ला भागात नजीर फकीर यांच्या घराजवळील वीज कंपनीचा विद्युत पोल धोकादायक अवस्थेत आहे. हा पोल जमिनीशेजारी गंजून गेला असून तो कधीही कोसळू शकतो, अशा अवस्थेत आहे. वादळी वारा, अवकाळी पाऊस याच्या शक्यतेमुळे तो पोल बदलून नवीन पोल बसविण्यात यावा अशी मागणी सैतवडे (गुम्बद) येथील नागरिकांनी केली आहे.
सध्या अवकाळी पाऊसाबरोबर वादळी वार्यानेही ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. सैतवडे व परिसरातही येत्या काही दिवसात वादळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. अखेरची घटका मोजणारा हा पोल कधीही कोसळू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच हा पोल गावातील भरवस्तीत आहे. त्यामुळे जवळच्याच घरावर पडल्यास घरांचे नुकसानीसोबत जिवीतहानी होऊ शकते. पोल बदलण्याच्या मागणीसाठी सैतवडेतील नागरिकांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली होती. अद्याप विद्युत कंपनीकडून या तक्रारीवर कार्यवाही झालेली नाही. पावसाच्या पार्श्वभूमीवर तातडीने हा पोल बदलून नवीन पोल बसविण्यात यावा अशी मागणी सैतवडे (गुम्बद) येथील नागरिकांनी केली आहे.