उक्षी गावात वादळी पावसामुळे नुकसान
संगमेश्वर :- संगमेश्वर आणि लांजा तालुक्याला आज दुपारनंतर अवकाळी पावसाने झोडपून काढले. साखरपा आणि संगमेश्वर परिसरात गारपीट, वादळी वाऱ्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.काल रात्रीही उशीरा देवरूख परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते.
आज सकाळपासून वातावरणातील उष्णता वाढली होती. त्यामुळे आज दुपारनंतर पाऊस कोसळणार असा सर्वांचा कयास होता. दुपारी 2 नंतर संगमेश्वर परिसरात वादळी वारा आणि ढगांचा कडकडाट सुरू झाला. यानंतर काही वेळाने जोरदार पावसाला सुरवात झाली, काही काळ गाराही पडल्या. सुमारे तासभर या परिसरात पाऊस कोसळत होता. सोसाट्याचा वाऱ्याने परिसरात काही ठिकाणी नुकसान झाले आहे. संध्याकाळी देवरूख, साखरपा परिसरातही वादळी वारा आणि ढगांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. वाऱ्याने अनेक घरांचे पत्रे उडाले, तर परिसरात चार ठिकाणी झाडे कोसळली आहेत. सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. साखरपा परिसरातही चांगलीच गारपीट झाली. संगमेश्वरप्रमाणेच लांजा तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळला. आजच्या पावसाने आंब्याचे मोठे नुकसान झाले असून अनेक गावातील झाडांवरचे आंबे गळून पडले आहेत.
चौकट
उक्षी गावाला वादळामुळे फटका
आज सायंकाळी अचानक झालेल्या वादळामुळे उक्षी गावाला चांगलाच फटका बसला आहे. वादळामुळे अनेक झाडे पडली आहेत. काही ग्रामस्थांच्या घरावर, शौचालयावर झाडांच्या फांद्या पडून नुकसान झाले आहे.यामध्ये फैजअहमद काझी,विश्वास जाधव, अशोक जाधव यांच्या घरावर झाडे पडली आहेत. यात झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा गावचे सरपंच मिलिंद खानविलकर, उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, पोलिस पाटील अनिल जाधव व तलाठी सकपाळ यांनी केला व याची माहिती प्रशासनाला देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करु असे गावचे सरपंच खानविलकर यांनी सांगितले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. सायंकाळी अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. या वादळामुळे अनेक झाडांच्या कैऱ्यासुद्धा अक्षरशः गळुन पडल्या आहेत. त्यामुळे आंबा बागायतदारांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.