रमजान महिन्यात गर्दी टाळण्याच्या सूचना

रत्नागिरी :-  रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण किंवा इफ्तारसारख्या धार्मिक कार्यक्रमांत कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी या सुचना केंद्र शासनाच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाकडून राज्य शासनाला प्राप्त झाल्या असून त्याची अंमलबजावणी जिल्हास्तरावर करण्यासाठी सुचना दिल्या गेल्या. जिल्हाधिकार्‍यांमार्फत याचे पालन केले जाणार आहे.

रमजान महिन्यात नियमित नमाज पठण व इफ्तारीच्या अनुषंगाने एकत्र येण्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रसार होऊ शकतो. त्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यात येत आहेत. राज्यात मार्चपासून साथरोग प्रतिबंध अधिनियम कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार जमावबंदी लागू केली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द केले आहेत. नजीकच्या काळात मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. या महिन्यामध्ये मुस्लीम समाजात मोठया संख्येने मशीदीत जाऊन तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजबांधव नमाज, इफ्तारसाठी एकत्र येतात. सद्य:स्थिती विचारात घेता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग किंवा संक्रमण होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लीम समाज बांधवांच्या आरोग्याच्या व जीवनाच्या हिताचे असल्यामुळे सार्वजनिकरित्या मशीदीत एकत्र येऊन नमाज अदा करु नये, असे संकेत अल्पसंख्याक मंत्रालयाकडून राज्यातील सर्व मुस्लीम धर्मीय लोकांना देण्यात आल्या आहेत.
सामाजिक विलगीकरणाचे पालन प्रत्येकाने करावे, कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये, घरात किंवा इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये, मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्त्तार करु नये, कोणताही सामाजिक व धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित करु नये, सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण धार्मिक कार्य पार पाडावे, लॉकडाऊनविषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उपरोक्त सूचनाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या सूचनांचे पालन करण्यासाठी मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे आवाहन एका निवेदनाद्वारे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.