नियम पाळूनच मासेमारीला परवानगी

रत्नागिरी :- कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. शनिवारी सायंकाळी मिरकरवाडा बंदरासह जिल्ह्यातील प्रत्येक बंदरातून मासेमारी नौका समुद्रात झेपावल्या. तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. हा व्यवसाय सुरू करताना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर अनेक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

राज्यावर कोरोनाचे संकट आल्याने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या लॉकडाऊनची मुदत केंद्र सरकारने वाढवल्याने तब्बल एक महिना अधिक काळ मासेमारी ठप्प राहिली होती. या कालावधीत केंद्राने मच्छीमारांना दिलासा देणारा निर्णय घेतला. नियम आणि अटींच्या आधारावर मासेमारीला परवानगी देण्यात आली. केंद्राने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मच्छीमारांनी तयारी सुरू केली. नियम आणि अटींच्या आधारावर मासेमारीला परवानगी देण्यात आली. मासेमारी सुरु झाल्यामुळे बंदरनावर गर्दी होऊ नये म्हणून फक्त मच्छिमारीशी निगडित लोकांना बंदरावर प्रवेश दिला जाणार आहे. एकावेळी केवळ चार नौका मासळी उतरवण्यासाठी बंदरात आणल्या जाणार आहेत.

यासाठी मिरकरवाडा बंदरावर दोन जेट्टी रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. या दोन जेट्टी वर दोन दोन नौका अंतर ठेवून उभ्या ठेवल्या जाणार आहेत. मासे उतरून बर्फ आणि पाणी भरून रवाना होतील असे नियोजन करण्यात आले आहे. लिलावाच्या ठिकाणी अन्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे अशी माहिती सहायक मात्स्य आयुक्त एम. व्ही. भादुले यांनी दिली. 
 शनिवारी सायंकाळी मिरकरवाडा बंदरतून नौका मासेमारीसाठी रवाना झाल्या. या नौका रविवारी उशिरा बंदरात दाखल होतील असा अंदाज आहे. रविवारी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असली तरी हा धोका पत्करून मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रात उतरवल्या.