रत्नागिरी :- रत्नागिरीतील चार कोरोनाबाधित रुग्णांपैकी राजीवडा येथील कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाची आणखी एकदा कोरोना चाचणी घेण्यात येईल. साखरतर येथील दोन महिला आणि एका 6 महिन्याच्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
मुंबईहून रत्नागिरीतील राजीवडा परिसरात आलेल्या 59 वर्षीय वृद्धाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला होता. कोरोनाचा नवा रुग्ण आढळल्याने रत्नागिरीत एकच खळबळ उडाली होती. 3 एप्रिल रोजी संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने यंत्रणा अलर्ट झाली होती. तत्काळ राजीवडा भाग सील करून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती.
दरम्यान शनिवार 18 एप्रिल रोजी राजीवडा येथील कोरोना बाधित रुग्णाचा दुसरा अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाला. या अहवालानुसार राजीवडा येथील तो रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. तरीदेखील आणखी एकदा या रुग्णाची कोरोनाची चाचणी करण्यात येईल. हा अहवाल आल्यानन्तर राजीवडा येथील जमावबंदी बाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान साखरतर येथील दोन महिला आणि एक सहा महिन्यांचा बच्चू या तिघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून या तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बोल्डे यांनी दिली.