कोरोना विरुध्द लढ्यात जिल्हा बँकेचा सहकार्याचा हात

व्हेंटिलेटर खरेदीसाठी रत्नागिरी जिल्हा बॅंकेची 13 लाख 36 हजारांची मदत

रत्नागिरी :- कोरोना रुग्णांना जिल्ह्यात अधिक चांगले उपचार, सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बँकेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला अनुसरुन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हा शासकीय रूग्णालयात व्हेंटिलेटर खरेदीसाठी 13 लाख 36 हजार 400 रूपयांची मदत दिली असून त्या मदतीचा धनादेश शनिवारी बँकेने पालकमंत्री ॲड.अनिल परब यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
         कोरोनाविरूद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक सज्ज आहे असे बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांनी जाहिर केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हा रूग्णालय सुसज्ज करायचे असून त्याकरिता बँकेनी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.त्यानंतर बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव आणि संचालक मंडळाने कोरोनाविरूध्दच्या लढ्यात जिल्ह्याला मदत करण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा रूग्णालयात व्हेंटिलेटर खरेदीसाठी बँकेने 13 लाख 36 हजार 400 रूपयांची मदत दिली आहे.बँकेचे कार्यकारी संचालक सुनील गुरव,सरव्यवस्थापक अजय चव्हाण, जनसंपर्क अधिकारी संदीप तांबेकर यांच्याकडून मदतीचा धनादेश पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार राजन साळवी, शेखर निकम आणि हुस्नबानू खलिफे उपस्थित होते.