कोरोनावर मात; एक हजार मेट्रिक टन हापूस आखाती देशात

रत्नागिरी :- कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करत कोकणातील हापूसची निर्यात सुरु ठेवण्यात यश आले असून आतापर्यंत सुमारे दीड लाख बॉक्स आखातात रवाना झाले आहेत. सुमारे एक हजार मेट्रीक टन निर्यात झाली. कोकणातून आवक कमी झाल्याने पेटीचा दर एक हजार ते अडीच हजारापर्यंत गेला असून सुरवातीपेक्षा तीनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे.

वाशी बाजार समितमधील कामकाज सोशल डिस्टन्सिंगनुसार चालणार आहे. एकावेळी दोनशे गाड्यांना परवानगी दिली आहे. टाळेबंदीचा फटका आंब्याच्या दरावर झाला होता. सहाशे रुपयांपासून ते अगदी दोन हजार रुपयांपर्यंत पेटीचा दर होता. सध्या परिस्थिती सुधारली असून कोकणातून येणार्‍या मालाची आवक घटल्यामुळे दर पुन्हा पेटीमागे तीनशे रुपयांनी वधारले आहेत. ही आंबा बागायतदारांसाठी दिलासादायक गोष्ट ठरणार आहे. कोरोनाच्या अवघड परिस्थितीत मुंबईतील व्यापारी थेट ग्राहकांपर्यंत माल पोचवत आहेत. वाशी बाजार समिती बंद झाल्यानंतर विक्रीचा प्रश्‍न होता; मात्र निर्यातदार, पणन मंडळाच्या सहकार्याने दलालांनी खासगी विक्री सुरू ठेवली. त्यामुळे झाडावर पिकनू गळून जाणारा माल विकला गेला आणि त्यातून शेतकर्‍याला पैसे मिळाले. सध्या आवक घटली असून 25 एप्रिलनंतर पुन्हा आवक वाढेल अशी शक्यता मुंबईतील दलालांनी व्यक्त केली.मार्चच्या अखेरीस आखाती देशांमधील निर्यातीला सुरवात होते. यंदा आंबा कमी असल्यामुळे कोरोनाच्या सावटामुळे निर्यातीला उशिर झाला. तरीही गेल्या पंधरा दिवसांमध्ये सुमारे दीड लाख बॉक्स संयुक्त अरब अमिराती, कुवेतसह आखाती देशांमध्ये हापूस पाठविण्यात यश आले आहे. त्यात निर्यातदारांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. प्रतिदिन 15 हजार पेटी आंबा निर्यातीसाठी पॅकींग केला जात असून कंटेनर आणि मालवाहू जहाज उपलब्ध झाल्यानंतर त्याची वाहतूक होते.

बागायतदारांना पॅकेज द्यावे
यंदा हापूसचा दर कोरोनामुळे गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. हंगाम उशिरा आणि मालही कमी आहे. त्यात कोरोनामुळे मार्केटींग व्यवस्थित न झाल्याने दरावर परिणाम झाला. गतवर्षी पेटीचा दर 15 मे मध्ये होता तोच 5 एप्रिलला मिळत आहे. शासनाने कोकणातील शेतकर्‍यांना पॅकेज देण्याची गरज आहे. यासाठी कोकणातील मंत्री उदय सामंत यांनी विशेष लक्ष घालावे अशी प्रतिक्रिया वाशीतील व्यावसायिक संजय पानसरे यांनी व्यक्त केली.