रत्नागिरी :- लॉकडाऊनच्या कालावधीत रत्नागिरीत वाहन चालकांनी नियम तोडण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. २२ मार्च पासून २८ दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी १३ हजार २४५ वाहन चालकांवर कारवाई करुन ४५ लाख ६६ हजार १०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. कमी कालावधीत इतक्या मोठया प्रमाणावर दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राज्यासह जिल्ह्यावरही कोरोनाचे संकट घोंघावत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी करण्यात आली. मात्र या संचारबंदीच्या कालावधीतदेखील लोक वाहन घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसली. अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेने कारवाईची जोरदार मोहीम राबवली. २८ दिवसाच्या कालावधीत वाहतूक शाखेने ४५ लाख ६६ हजार १०० रु.चा दंड वसूल केला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई विना हेल्मेट फिरणार्या वाहन चालकांवर करण्यात आली आहे. अशा ५ हजार ९४१ वाहन चालकांकडून २९ लाख ७० हजार ५०० रक्कम वसूल करण्यात आली आहे. सीट बेल्टचा वापर न करणार्या ५१७ चालकांना १ लाख ०३ हजार ४ ००, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणार्या ४१ जणांकडून ८ हजार २०० रु. , इन्शुरन्स नसणार्या २७ जणांकडून ३७ हजार , लायसन्स नसणार्या २०५ वाहन चालकांना १ लाख ०२ हजार ५००, फॅन्सी नंबर वापरणार्या ३०९ जणांना ६६ हजार ६००, अधिकृत कागदपत्र नसणार्या २ हजार ६२० जणांना ५ लाख २४ हजार, तिब्बल सीट दुचाकी चालवणार्या ७८ जणांना १५ हजार ६०० आणि इतर ३ हजार १९० जणांना ६ लाख ६१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.