रत्नागिरी :- संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणार्या नामचीन गुंडाने राम नाक्याजवळ धिंगाणा घातला. पोलिसांनी अडविल्यावरून महिला पोलिस कर्मचार्याशी त्याने हुज्जत घातली. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी या गुंडाला हटकल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. गुंडाने पोलिस कर्मचार्यांवर हात उगारल्यानंतर पोलिसांनीही त्याला खाक्या दाखवत चांगलीच धुलाई केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुंडाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि संचारबंदीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला.
सागर सुरेश गुरव (वय 40, रा. झारणीरोड-रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. 18) दुपारी साडेबाराच्या सुमारास राम नाका येथे घडली. संचारबंदी कायदा धाब्यावर बसवत नामचीन गुंड सागर गुरव शहरात फिरत होता. त्यावेळी वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचार्यांनी अडवले. संचारबंदी लागू आहे, विनाकारण फिरू नका, घरी जा असे सांगितले. मात्र यावरून गुरव याने त्या पोलिस कर्मचार्यांबरोबर हुज्जत घातली. दोघांमध्ये वाद सुरू झाला. मी घाबरत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असे उद्धट उत्तर गुरव याने दिले.
यावेळी गुंडाने पोलिस अधिकार्यांवर हात उगारला. अखेर पोलिस कर्मचार्यानेही खाक्या दाखविला. वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल विभूतेही तिथे आले. त्यांनीही त्याला सुनावले. या प्रकरणाची शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणि संचारबंदीचे उल्लंघन तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, तसेच साथ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.