रत्नागिरी :- कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम काम झाले आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा कोरोना मुक्त होईल अशी आशा पालकमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच मिरज येथील प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात नमुने तपासणीसाठी येते असल्यामुळे विलंब होतो. त्यावर उपाय म्हणून पुन्हा पुण्यात नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतील.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने उपस्थित होते. ते म्हणाले, आजारामुळे जिल्ह्यात येता आले नाही. माझ्या अनुपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्याकडे लक्ष ठेवले. त्यांचे विशेष अभिनंदन करत आहे. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी चांगले काम केले आहे. प्रशासनाच्या चांगल्या कामामुळे कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात सहा पॉझिटीव्ह रुग्ण सापडले. त्यातील एक बरा झाला तर एकाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित चार जणांवर उपचार सुरु आहेत. शिमगोत्सवासाठी कोकणात आलेल्या चकरमान्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. तपासणी नमुने मिरज येथे पाठवले जातात. तेथे क्षमता कमी असल्याने अहवाल येण्यास विलंब होतो. त्यामुळे नमुने यापुढे पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे अधिकारी राज्य शासनाने जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या साह्याने त्याची अंमलबजावणी करावयाची आहे. 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जाणार आहे. त्याबाबत केंद्र शासनाने राज्याला सूचना दिल्या असून त्याची अंमलबजावणी राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हास्तरावर होईल. त्यात काही उद्योग सुरू होतील. त्यावर दोन दिवसात निर्णय होईल. जिल्हाधिकारी त्यांना परवानगी देणार आहेत. मत्स्योद्योग सुरू झाले असून मासेमारीला जाताना नौकांवर पाच खलाशांनाच परवानगी दिली होती. पण नौकांवर त्यापेक्षा अधिक खलाशी लागतात. त्याविषयी जिल्हाधिकारी चर्चा करून योग्य निर्णय घेतील.