रत्नागिरी :- लॉकडाऊनच्या काळात कोकण रेल्वे महत्त्वाची भूमिका पार पाडतेय. या कठिण काळात अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून कोकण रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात अन्नधान्य पोहोचवले जात आहे. कोकण रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली तरी मालवाहतूक मात्र सुरू आहे. कोकण असेल की केरळ, तामिळनाडू या ठिकाणी धान्य पोहोचवण्याचं काम सध्या कोकण रेल्वे करत आहे. रत्नागिरीमध्ये देखील कोकण रेल्वेच्या साहाय्यानं 2655 टन धान्य विशेष मालगाडीतून आणले गेले.
त्यानंतर हे धान्य आता प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचवले जाणार आहे. आगामी काळात देखील आता सर्व गोष्टी सुरळीत होईपर्यंत मालवाहतूक करण्यास आणि जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवणार नाही याकरता कोकण रेल्वे प्रत्नशील असणार आहे. आज रत्नागिरीत दाखल झालेली मालगाडी ही हरियाणामधून आली. तसेच सिंधुदुर्गसाठीही लवकरच अन्नधान्याची गाडी येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक शैलेश आंबरडेकर यांनी दिली आहे..