शिरगाव पोलिसांची धडक कारवाई; 17 दुचाकी जप्त

चिपळूण :- लॉकडाऊन सुरू असताना देखील विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्या मोकाट दुचाकीस्वाराना शिरगाव पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.दिवसभरात तब्बल 17 दुचाकी ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत. तर 40 जणांवर केस दाखल केल्या आहेत. डीवायएसपी नवनाथ ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक बडे नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे.सुरुवातीला १४ एप्रिल पर्यंत असणारे लॉकडाऊन आता थेट ३ मे पर्यंत वाढवण्यात आले असून प्रशासन त्याची काटेकोर अंमलबजावणी करत आहे.परंतु काही वाहनधारकांनी अद्याप हा विषय फारसा गांभीर्याने घेतलेला दिसत नाही.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली खोटी कारणे पुढे करून अनेकजण विनाकारण दुचाकी घेऊन फिरत असतात.गेले काही दिवसात ही संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येताच शिरगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली.काल दिवसभरात चिपळूण मध्ये तब्बल ५० दुचाकी ताब्यात घेऊन तीन महिन्यासाठी जप्त केल्या आहेत. तरीही आज बरेच दुचाकीस्वार रस्त्यावर उतरले होते.
       कोरोना संसर्गाची शक्यता पाहता कोणीही घराबाहेर पडू नका असे निवेदन करून झाले, दंडात्मक कारवाई झाली, विविध प्रकारे जनजागृती करून झाली तरी देखील काही लोक विनाकारण दुचाकी घेऊन फिरत आहेत.त्यामुळे ही कडक कारवाई करण्यात येत असून ही कारवाई आता दररोज केली जाणार आहे.ताब्यात घेतलेल्या दुचाकी आता ३ महिन्यासाठी जप्त करण्यात आले असून कोणालाही मुभा दिली जाणार नाही अशी माहिती पोलिसांनी  दिली.