विनाकारण बाहेर पडाल तर ‘सेल्फी’श ठराल

रत्नागिरी :- विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे. विनाकारण गाड्या घेऊन बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी फाईन भरून बसवून ठेवलेच परंतु सेल्फी पॉईंट तयार करून या पॉईंट समोर सर्व वाहन चालकांचा सेल्फी घेण्याची वेगळीच शिक्षा दिली. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी गुरुवारी सायंकाळ पासून पोलिसांनी कारवाई अधिक कठोर केली आहे.

शुक्रवारी सायंकाळी मारुती मंदिर येथे आगळा वेगळा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला. मी घरात न थांबणारा, मी कोरोना पसरणारा, मीच मूर्ख, मी बेजाबाबदार नागरिक, मी ‘सेल्फी’श असा बोर्ड तयार करून या बोर्ड सोबत विनाकारण बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांचा सेल्फी घेण्यात आला. केवळ सेल्फी वरच न थांबता या वाहन चालकांना प्रत्येकी फाईन घेऊन मारुती मंदिर सर्कल मध्ये एक तासापेक्षा अधिक काळ बसवून ठेवण्यात आले. येणाऱ्या कालावधीत ही कारवाई अधिक कठोर करण्यात येणार आहे.