चिपळूण :- तालुक्यातील दहा गावांना अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला आहे. यामध्ये 100 घरांचे सुमारे 8 लाखांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बोरगाव- चिवेली परिसरात 184 शेतकऱ्यांच्या 68 हेक्टवरील शेतीचेही नुकसान झाले आहे. कोरोनामुळे हलाखीत असलेल्या ग्रामस्थांना अवकाळी पावसाने आणखी संकटात टाकले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक नागरिकास घरी थांबण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. उद्योग व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातच दोन दिवसांपूर्वी तालुक्यात वादळी वारा आणि पावसाचा तडाखा बसला. वेगवान वाऱ्याने अनेकांच्या घरातील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी मोठी झाडे कोसळून ती घरावर पडली. परिणामी घरांचे पत्रे, कौले कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे.
यामध्ये तालुक्यातील बोरगाव, बामणोली, करंबवणे, तळवडे, कोळकेवाडी, भिले, कालुस्ते बु, चिवेली, खडपोली, कळकवणे या गावातील घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बोरगाव येथील 61 घरांना आणि 2 गोठ्यांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. बामणोली येथील 15 घरे व 5 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. त्यानुसार तालुक्यात सुमारे 8 लाखाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.