गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी
ग्रामीण अर्थव्यवस्था तालुक्यांच्या बाजारापेठांवर अवलंबून, बाधित नसणाऱ्या तालुक्यांचा विचार होण्याची मागणी!
देवरूख:- 20 एप्रिल नंतर लॉक डाऊन काही प्रमाणात शिथील केला जाणार असेल तर दुर्गम भाग असणाऱ्या कोकणात तालुका निहाय लॉक डाऊनचे नियोजन करून बाधित नसणाऱ्या ग्रामीण तालुक्यांत काही प्रमाणात अंतर्गत व्यवहार सुरू करावेत अशी विनंती गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री यांना ईमेल पाठवून केली आहे.
गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या ईमेल मध्ये म्हटले आहे की,लॉक डाऊन मध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे.शेतीचा हंगाम सुरू होणार आहे.ग्रामीण भागातील सामान्य माणसाच्या मोलमजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.दुर्गम भागात वसलेल्या कोकणात दोन तालुक्यातील मुख्य बाजारपेठांचे अंतर ही दूरचे असते,परिणामी 20 एप्रिल नंतर राज्यातील काही जिल्ह्यात आपण लॉक डाऊन मध्ये काही सवलती देणार असाल तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वसलेल्या कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत बाधित नसणाऱ्या तालुक्यांना व मागील महिनाभरात ज्या तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही त्या तालुक्या अंतर्गत ग्रामीण अर्थव्यवस्था व अंतर्गत व्यवहार काही प्रमाणात सुरळीत करता येईल का या दृष्टीने विचार व्हावा,अशी विनंती खंडागळे यांनी या पत्रात केली आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ठिकाणी हॉट स्पॉट आहे किंवा ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे तो तालुका कठोर अंमलबजावणी करून रहदारीसाठी पूर्णतः बंद करून बाधित नसणाऱ्यां अन्य तालुक्यांना/ग्रामीण भागांमध्ये त्यांच्या अंतर्गत व्यवहार,रोजगार,शेती पूरक व्यवसाय ,छोटे उद्योग,मोलमजुरी यासाठी सवलत मिळावी,त्या दृष्टीने विचार व्हावा असेही सुहास खंडागळे यांनी या पत्रात म्हटले आहे.
कोकणात ग्रामीण भागात दोन तालुक्यातील मुख्य बाजारपेठांचे अंतर हे साधारण 50 किमी चे असते.अत्यावश्यक सेवा वगळून तालुक्याच्या सीमा बंद करून तालुका निहाय नियोजन करणे नागरिकांच्या व प्रशासनाच्या ही सोयीचे ठरेल असे सुहास खंडागळे यांनी या पत्रात म्हटले आहे.
ग्रामीण भागात तालुक्याचे ठिकाण हे अनेक गावांना 20 ते 25 किमी दूर असते अशा स्थितीत ज्या तालुक्यात कोरोना बाधित नाहीत त्या ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देता येईल का? याचाही प्रशासनाने विचार करावा अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे.
कोरोना विरोधात महाराष्ट्र आपल्या नेतृत्वाखाली देशाला नक्कीच दिशा दाखवेल आणि ही लढाई नक्की जिंकेल हा विश्वास तमाम महाराष्ट्र वासीयांना आहे असे खंडागळे यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.