केशरी रेशनकार्डधारकांनाही मिळणार धान्य

रत्नागिरी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत. शासनाने बीपीएल व केशरी रेशनकार्ड असलेल्या लाभार्थ्यांनाही गहू आणि तांदूळ दिला जात आहे.
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यातील 2,83,565 पैकी 2,22,958 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 79,673 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना धान्य दिले जात आहे. आता बीपीएल व केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो तांदूळ दिला जातो. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे 8882 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहेत, तेथे पोर्टबिलीटीद्वारे ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. जिल्हयात 1 लाख केशरी शिधापत्रिका आहेत.

कोरोना रेशन कार्ड नसणार्‍यांना शिवभोजन थाळीचा आधार रत्नागिरी जिल्ह्यात देण्यात आला आहे. शिवभोजन रत्नागिरीत शहरात 3 केंद्रांना मान्यता दिली होती. त्याद्वारे 450 थाळयांच्या माध्यमातून गरिबांना जेवण मिळते. रत्नागिरी तालुक्यात 4 ठिकाणी, खेड आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी 2 ठिकाणी तसेच दापोली, गुहागर, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी एक अशी 13 केंद्र सुरू करून त्याद्वारे केवळ 5 रुपयात जेवण देणार्‍या 1275 थाळयांची व्यवस्था करण्यात आली.