कळझोंडी धरणात 62 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा 

रत्नागिरी :- जयगड पंचक्रोशीला पाणीपुरवठा करणार्‍या कळझोंडी धरणात 62 दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला समान पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे चाळीस ठिकाणी जलमापक बसविण्यात आले असून प्रति माणसी 45 ते 50 लिटर पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. या परिसरातील काही गावांना जिंदल कंपनीद्वारे तर अन्य भागात एक दिवस पाणी पुरवठा केला जाणार आहे.

जयगड पंचक्रोशीत 14 ग्रामपंचायतींमध्ये 30 महसूली गावे आहेत. या परिसरात साडेपाच हजार कुटूंबात 35 हजार लोकं वास्तव्याला आहेत. त्यांना प्रतिदिन 18 ते 20 लाख लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा करावा लागतो. कळझोंडी येथील धरणावरुन राबविण्यात आलेल्या पाणीयोजनवरच याचा सर्व भार असतो. कळझोंडी धरणात असलेला गाळ आणि धरणाला लागलेली गळती यामुळे एप्रिलनंतर पाणी साठ्यात घट होते. त्यामुळे टंचाईला सुरवात होते. गतवर्षी जयगड पंचक्रोशीत अखेरच्या टप्प्यात पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. कळझोंडी धरणात सध्या 62 दिवस पुरेल एवढा पाणी साठा आहे. तरीही वाढता उष्मा आणि धरणाला लागलेली गळती यामुळे पाणी साठा घटण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन यंदा रत्नागिरी पंचायत समितीने नियोजन करण्यास सुरवात केली आहे.

कोरोनामुळे गेले काही दिवस लॉकडाऊन करण्यात आल्याने कामे ठप्प झाली आहेत. तरीही पाणी विभागाकडून उत्तमरितेने प्रयत्न सुरु होते. पंचक्रोशीतील सर्व गांवाना समान पाणी मिळावे यासाठी वॉटर मीटर बसवण्यात आले आहेत. त्याद्वारे दिवसाला सुमारे 20 लाख लिटर पाणी प्रतिदिन दिले जाते. या परिसरातील पाच गावांना जिंदल कंपनीच्या पाईपलाईनवरुन पाणीपुरवठा सुरु केला आहे. चाफेरी, कासारीतील काही लोकांचा याचा पुरवठा होतो. धरणाचा फोटोतसेच उर्वरित गावांना कळझोंडी धरणातून पाणी दिले जात आहे. 


जलमापकमामुळे 45 ते 50 लिटर प्रती माणसी पाणी दिले जाते. गावाला पाणी किती दिले जाते ते या वॉटर मीटरमुळे समजते. सध्या शाखा अभियंता पद रिक्त असले तरीही उपअभियंता ॠषभ उपाध्ये यांच्यामार्फत नियोजन सुरु आहे. कळझोंडी धरणाला गळती लागल्यामुळे पाणी वाहून जाते. ते पुन्हा धरणात सोडण्यासाठी पंप लावण्यात आला आहे.
पाणी पुरवठा विभागाचे तेरा कर्मचारी, सात कंत्राटी लोक, ग्रामपंचायतींची सुमारे 15 ते 20 जण मिळून सुमारे चाळीस जणं काम करत आहेत. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये टंचाइग्रस्त भागातील लोकांना पुरेसे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे उपअभियंता ॠषभ उपाध्ये यांनी सांगितले.