लॉकडाऊनचा फटका; जिल्ह्यात विजेच्या मागणीत प्रचंड घट

रत्नागिरी :- लॉकडाऊनचा मोठा फटका महावितरण कंपनीला बसला आहे. या 22 दिवसांच्या काळात थोडी-थोडकी नाही तर तब्बल 14 मेगा वॅट विजेची जिल्ह्याची मागणी डाऊन (कमी) झाली आहे. उद्योग आणि व्यापार बंद ठेवण्यात आल्याने विजेची मागणी घटली आहे. याचा महावितरणच्या महसुलावरही परिणाम होणार आहे. घरगुती, कृषी आणि लोटेतील काही कारखाने वीज महावितरण कंपनीला तारले आहे.
कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी देश, महाराष्ट्र आणि जिल्ह्यात 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्याची काटेकोर अंमलबजवाणी होण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे चार लोकांच्यावर कोणी एकत्र येऊ शकत नसल्याने जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद करण्यात आले आहेत. तसे व्यापारावरही त्याचा परिणाम झाला आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील उद्योगांची धडधड लॉकडाऊनमुळे थांबली आहे. महावितरण कंपनीचे जिल्ह्यात 5 लाख 80 हजार वीज ग्राहक आहेत. यामध्ये उद्योग, व्यापारी, घरगुती, कृषी आदींचा समावेश आहे. या सर्व ग्राहकांना सुमारे 108 मेगावॉटची मागणी असते. त्यांच्याकडून वर्षाला सुमारे 74  कोटी 34 लाखाचा महसुलाचे उद्दिष्ट महावितरण कंपनीला दिले आहे. मार्चपुर्वी त्यापैकी 63 कोटी 90 लाख रुपये वसूल झाले होते. 15 कोटी 4 लाखाच्या दरम्यान थकबाकी होती.  100 टक्के वसुलीसाठी कंपनीची धडपड सुरू
होती.
मात्र 22 मार्चपासून अचानक देश, राज्य आणि जिल्ह्यात 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाला. सर्व उद्योग, व्यापार बंद ठेवण्यात आला. महावितणला महसुल मिळवुन देणार्‍यांमध्ये घरगुतीबरोबर उद्योग आणि व्यापारी ग्राहकांचा मोठा वाटा आहे. हे बंद पडल्याने 108 मेगा वॉट वरून विजेची मगणी 94 मेगावॉट एवढी कमी झाली. 22 दिवसाच्या काळात 14 मेगावॉट विजेची मागणी घटली. आता फक्त घरगुती ग्राहक, कृषी आणि लोटे एमआयडीसीतील मोजकेच कारखाना  सुरू असल्याने विजेची 94 मेगावॉट मागणी आहे. याचा महावितरणच्या महसुलावर थेट परिणाम होणार असून महसुलही घटण्याची चिंता कंपनीला सतावू लागली आहे.