रस्ते, मैदानांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांचा अचानक स्ट्राईक

रत्नागिरी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना विनाकारण रस्ते आणि मैदानावर हजेरी लावणाऱ्या नागरिकांवर रत्नागिरी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अचानक स्ट्राईक केला. रस्त्यावर वाहन तपासणीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर मैदानावर वॉकसाठी बाहेर पडलेल्याना मैदानात बसवून ठेवण्याची चांगलीच शिक्षा दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीचे काटेकोर पणे पालन सुरू होते. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्याना पोलिसांच्या बांबूचे फटके खावे लागले तर काहींना चांगलाच फाईन भरावा लागला. यामुळे संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू होती. मात्र अत्यावश्यक सेवांसाठी पास दिल्यानंतर रस्त्यांवर वर्दळ वाढली. पासधारक वाढल्याने पोलिसांनीही थोडी उसंत घेतली आणि विनाकारण बाहेर पडणाऱ्याचे फावले होते.  परंतु गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी अचानक स्ट्राईक केला. रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यावर आणि संचारबंदीच्या कालावधीत मैदानावर वॉक साठी येणाऱ्याना चांगलीच अद्दल घडवली. मारुती मंदिर स्टेडियम वर 20 जण होते त्यांना मैदानावर बसवून ठेवण्यात आले. तर प्रत्येक चेकपोस्ट वर वाहनांची कसून तपासणी सुरू करण्यात आली.