रत्नागिरी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीसाठी मुकुल माधव विद्यालयाने नियोजन करुन प्रयत्न सुरू केले आहेत. व्हॉट्सअप ग्रुपव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यास पाठवला जातो आणि केलेला अभ्यास पालक शिक्षकांना पाठवतात. यामुळेच शिक्षक, विद्यार्थी व पालक मिळून सारेजण टाळेबंदीतही विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी अविरतपणे कार्यरत आहेत. कोरोनाच्या साथीमुळे शाळेला सुट्टया आहेत. मुकुल माधव विद्यालयामधील नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयाच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअप ग्रुपमधून रोज सोडवायला सांगितल्या जातात. सध्याच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित हे प्रश्नसंच दररोज पालक व्हॉट्सअप ग्रुपमधून शिक्षकांकडे पाठवतात. हे प्रश्नसंच शिक्षक तपासून विद्यार्थ्याना त्यांच्या काही सुधारणा असल्यास त्या समजावून सांगतात.विद्यार्थीही परीक्षा नाही म्हणून अभ्यास करायचा नाही असे न करता शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करत आहेत. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्काईप च्या माध्यमातून वैयक्तिक शिकवण्या घेतल्या जात आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या हळूहळू सम्पर्कात येण्यासाठी मुकुल माधव विद्यालयातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त देखील चित्रकला, रंगकाम आणि योगावर आधारीत व्हिडिओ पाठवून या तणावाच्या काळात मन शांत ठेवण्याचे पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गोळप सारख्या ग्रामीण भागामध्ये अशाप्रकारचा शहरी भागात राबविला जाणारा उपक्रम गावातील मुलांसाठी उपलब्ध झाल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमात नियोजनपूर्वक आपला वेळ देउन विद्यार्थ्याच्या हितासाठी काम करणा-या शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच पालकांनीही आपल्या मुलांना आवश्यक तांत्रिक उपकरणे घेऊन या शिक्षणाच्या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.