जिल्ह्यात आतापर्यंत 369 पैकी 273 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी :- गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यात यंत्रणा अलर्ट झाली. आतापर्यंत जिल्ह्यात 369 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. विशेष म्हणजे यापैकी तब्बल 273 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 87 जणांचे अहवाल येणे बाकी असून 3 जणांचे अहवाल नाकारण्यात आले आहेत.  लॉकडाऊन अंमलबजावणीचे  काम जिल्हयात सर्वत्र सुरु आहे. अंतर्गत रस्त्यावर कारणाशिवाय कुणीही येवू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची एकूण संख्या 1105 आहे. संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 260 आहे.  जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत. येथे 5 रुपयात भोजन देण्याची व्यवस्था आहे. या माध्यमातून जिल्हयात 1275 थाळी उपलब्ध आहेत. परप्रांतातून आलेल्या आणि जिल्हयात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्ह्यात 62  निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 427 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.   जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या 7 हजार 622 जणांच्या जेवणाची व्यवस्था, शिवभोजन थाळी, तहसिल कार्यालये आणि एनजीओ च्या माध्यमातून करण्यात आली आहे.
   होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक,  नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.