चिपळूण :-लॉकडाऊन सुरू असताना विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्याना चिपळूण पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.दिवसभरात तब्बल ५० दुचाकी ताब्यात घेऊन चक्क तीन महिन्यासाठी जप्त केल्या आहेत.डीवायएसपी नवनाथ ढवळे पोलीस निरीक्षक देवेन्द्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे.सुरुवातीला १४ एप्रिल पर्यंत असणारे लॉकडाऊन आता थेट ३ मे पर्यंत वाढवण्यात आले असून प्रशासन त्याची काटेकोर अंमलबजावणी करत आहे.परंतु काहींनी अद्याप हा विषय फारसा गांभीर्याने घेतलेला दिसत नाही.अत्यावश्य सेवेच्या नावाखाली खोटी कारणे पुढे करून अनेकजण विनाकारण दुचाकी घेऊन फिरत असतात.गेले काही दिवसात ही संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येताच चिपळूण पोलिसांनी पुनः एकदा कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली.
चिपळूण शहरात आज स्वतः डीवायएसपी नवनाथ ढवळे आणि पोलीस निरीक्षक देवेन्द्र पोळ रस्त्यावर उतरले आणि सकाळीच त्यांनी वाहन तपासणी कारवाईला धडक सुरुवात केली.एक-एक करत तब्बल ५० दुचाकी ताब्यात घेऊन थेट ३ महिन्यासाठी जप्त केले आहेत.सायंकाळ पर्यंत ही कारवाई सुरू होती.शहरातील मुख्य रस्त्यावर ही कारवाई करण्यात येत होती.कारवाई होत असल्याचे समजताच शहरात चांगलीच धावपळ उडाली आणि दुपार नंतर रस्त्यावर वाहनांची संख्या कमी झाली होती.
संकट गंभीर आहे,घराबाहेर पडू नका. अशा सतत विनंत्या करून झाल्या, दंडात्मक कारवाई झाली.विविध प्रकारे जनजागृती करून झाली तरी देखील काही लोक विनाकारण दुचाकी घेऊन फिरत आहेत.त्यामुळे ही कडक कारवाई करण्यात येत असून ही कारवाई आता दररोज केली जाणार आहे.ताब्यात घेतलेल्या दुचाकी आता ३ महिन्यासाठी जप्त करण्यात आले असून कोणालाही मुभा दिली जाणार नाही.अशी माहिती पो.नी.देवेन्द्र पोळ यांनी दिली आहे.