रत्नागिरी :- कोरोनामुळे संपूर्ण देश आर्थिक संकटात अडकला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांचा पगार मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात येणार होता. मात्र एस.टी महामंडळाच्या कर्मचार्यांचे 75 टक्के पगार झाला आहे. संपूर्ण देश, राज्य आणि जिल्हा लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटी सेवा पूर्णतः ठप्प आहे. या लॉकडाऊनचा एसटी प्रशासनाला मोठा फटका बसला. आतापर्यंत कोट्यावधीचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करणार की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु याला पूर्णविराम मिळाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील साडेचार हजार कर्मचार्यांचा 6 कोटी 17 लाख पगार जमा झाल्याची माहिती विकास नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली. 13 एप्रिलपर्यंत एस.टी.कर्मचार्यांचे पगार झाले नव्हते त्यामुळे कर्मचारी वर्ग संभ्रमावस्थेत होता. मात्र दोन दिवसांपूर्वीच प्रत्येक कर्मचार्यांच्या अकाऊंटमध्ये 75 टक्के पगार जमा झाला. लॉकडाऊनमुळे पगार होईल की नाही साशंकता वाटत असताना कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.