आदर्शवत; जि. प. अध्यक्ष असेपर्यंतचे मानधन करणार मुख्यमंत्री फंडामध्ये जमा 

रत्नागिरी :- शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा यांसह विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच कार्यरत असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मदतीचा हात पुढे केला आहे. अध्यक्षपदावर कार्यरत राहू तेवढ्या महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. गेल्या महिन्यातील मानधनाचा धनादेशही त्यांनी सुपुर्द केला आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातच नव्हे तर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान फंडासह मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे आर्थिक मदतीचा ओघ सुरु आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला. त्यापुढे जाऊन बने यांनी सर्व महिन्याचे मानधन देण्याचे जाहीर केले आहे. अध्यक्षांसाठी शासनाने पंचवीस हजार रुपये मानधन निश्‍चित केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तरुण व्यक्तीमत्व म्हणून बने यांच्याकडे पाहिले जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने ग्रामीण भागातील गैरसोय सुुरु होती. त्यावर उपाययोजना म्हणून बने यांनी संगमेश्‍वर तालुक्यातील आपल्या जिल्हा परिषद गटातील दहा गावांना भाजीपाला पोचवण्यासाठी यंत्रणा राबवली. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा करण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. कोरोनाच्या लढाईत जिल्हा परिषदेची यंत्रणा प्रत्यक्ष मैदानात उतरली आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बने यांनी खेड, मंडणगड, चिपळूण तालुक्याचे दौरे केले. तेथील आरोग्यासह जिल्हा परिषद यंत्रणेशी संवाद साधला. बने यांच्या भेटीने कर्मचार्‍यांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. त्यांच्या दौर्‍यामुळे मंडणगडमध्ये शिवभोजन थाळी सुरु करण्याचा मार्गही मोकळा झाला होता. जिल्हा परिषदेमध्ये सतत कार्यरत राहून येणार्‍या प्रत्येक गोष्टींचा ते आढावा घेत आहेत.