रत्नागिरी :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळांचे कामकाज बंद ठेवण्यात आले.यामुळे अनेक शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पाऊले उचलली. यात जिल्हा परिषदेनेही आघाडी घेतली आहे. आता कृतीयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना ऑनलाईन घेता येणे शक्य आहे. तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षकांनी तयार केलेल्या पहीली ते पाचवीच्या अभ्यासक्रमाचे व्हीडीओ ब्लॉगवर उपलब्ध करुन दिले आहेत. घरबसल्या अडीच हजार जिल्हा परिषद शाळांतील अडीच लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येऊ शकणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले.
कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीने भारतातील सर्वच क्षेत्रांचे कामकाज थांबले आहे. त्यात शैक्षणिक क्षेत्रही मागे राहीलेले नाही. आपत्कालीन उपाय म्हणून सर्व शाळा बंद केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाची मदत घेतली जात आहे. आर्थिक परिस्थिती चांगलेल्या पालकांना शाळाबाह्य शिकवण्या, ऑनलाईन वर्ग परवडतात. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरच्या घरी ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळणे अशक्य आहे. सध्या बहूतांश घरात ऑनलाईन शिक्षण देता येण्यासाठी आवश्यक मोबाईल उपलब्ध असतात. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी अध्यक्ष रोहन बने, शिक्षण सभापती सुनील मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, संतोष थेराडे, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव यांनी विचारविनिमय करुन जिल्हा परिषदेच्या ब्लॉगवर पाचवीपर्यंतचा अभ्यासक्रम असलेले व्हीडीओ अपलोड केले आहेत.
यासाठी जिल्हा परिषदेचा स्वतंत्र ब्लॉग तयार आहे. यावरुन इंटरेक्टीव्ह प्रोजेक्ट डाऊनलोड केल्यावर संगणक, लॅपटॉप, मोबाईलमध्ये ऑफलाईन स्वरूपात त्याचा लाभ घेता येतो. इयत्ता 1 ली ते इयत्ता 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी इयत्तेनुसार मराठी, इंग्रजी, गणित तसेच परिसर अभ्यास, हिंदीचा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे सर्व विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करुन दिले आहे. कोरोनातील अडचणीत याचा पुरेपूर उपयोग होणार असून जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांमार्फत प्रत्येक प्राथमिक शिक्षकांकडे ही माहिती पोचवली जाणार आहे. शिक्षक गावातील पालकांपर्यंत हा ब्लॉग पोचवणार असून त्याद्वारे अभ्यास घेतला जाऊ शकतो.