लॉकडाऊन काळात शिधापत्रिका पोर्टेबिलिटीने धान्य मिळणार

रत्नागिरी :- वाढलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गावागावात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिधापत्रिका पोर्टेबिलिटीच्या सहाय्याने शिधापत्रिका धारकांना इतर कोणत्याही रेशन दुकानात रेशन घेता येणे शक्य होणार आहे.  राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील कोरोना विषाणूचे प्रसारामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातही लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. अशा परिस्थितीत अडकून पडलेल्या कामगार व नागरिकांची रेशनची व्यवस्था व्हावी यासाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाने दिलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील कुठेही पोर्टेबिलिटीने जिल्ह्यामध्ये बाहेरील जिल्ह्यांतून किंवा तालुक्यातून आलेल्या परंतु लॉकडाऊन मुळे आपल्या मूळ गावी न जाऊ शकलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना एप्रिल 2020 ते जुन 2020  तीन महिन्यात ते ज्या गावांमध्ये अडकले आहेत, त्या गावातील रेशन दुकानात पोर्टेबिलिटीच्या साह्याने धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी लाभार्थ्यांनी दुकानदारांचे संपर्कात राहून शासनास सहकार्य करावे. मात्र ज्या गावांमध्ये मोबाइल नेटवर्क नाही तिथे पोर्टबिलीटीचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी रत्नागिरी यांनी कळविले आहे.