आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे जि. प. प्रशासनाला निवेदन
रत्नागिरी :- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष गावागावात जाऊन सर्व्हेक्षणाची जबाबदारी आरोग्य कर्मचार्यांवर देण्यात आली आहे, मात्र त्या कर्मचार्यांना सुरक्षेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. तसेच ग्रामस्थांकडून माहिती लपवण्याच्या दुर्दैवी घटना घडल्यास त्याला आरोग्य सेवकांना जबाबदार ठरवण्यात येऊ शकते. याबाबत सहानुभूतीपुर्वक विचार जिल्हा परिषद प्रशासनाने करावा असे निवेदन जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
कोरोना ही जागतिक आपत्ती आहे. त्याचा प्रादुर्भाव राज्यात वाढू नये यासाठी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. काही ठिकाणी आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पदे रिक्त आहेत. त्याचा अतिरिक्त पदभार अन्य कर्मचा-यांकडे सोपवलेला आहे. याचा परिणाम कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या सर्वेक्षणावर होऊ लागला आहे. आरोग्य सेवेत अपु-या मनुष्यबळामुळे प्रतिबंधात्मक सेवा देणा-या अशोक बोरसे आरोग्य कर्मचा-यांना जास्त कार्यभार असल्यामुळे जास्त लोकसंख्येत काम करावे लागत आहे. या कर्मचार्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. आरोग्य कर्मचारी हे अवैदयकिय कर्मचारी म्हणून ओळखले जातात. ही बाब अत्यंत महत्वाची आहे. प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन साथ प्रतिबंधात्मक सेवा देण्याचे काम सर्व आरोग्य कर्मचारी करत आहेत. त्यांना कोणत्याही मुलभुत आवश्यक साहित्य पुरेशा प्रमाणात मिळालेले नाही. आरोग्य कर्मचारी यांना सॅनिटायझर, हँडवॉश, साबणवड्या, मास्क, हँडग्लोज याची आवश्यकता आहे. दर दिवसाला मास्क, हँडग्लोज मिळाले पाहीजेत अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून कोरोनाकरीता आरोग्य कर्मचारी यांच्या नेमणुका रेल्वेस्टेशन व क्वारंनटाईन केलेल्या रुग्णाच्या इथे लावल्या गेल्या आहेत. त्यामुळे कार्यक्षेत्रात सर्व ठिकाणी सर्व्हेलन्स करता येत नाही. त्या कार्यक्षेत्रात काम करताना काही दुर्दैवी घटना घडल्यास त्याचा ठपका आरोग्य कर्मचारी यांच्यावर ठेवण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कर्मचार्याचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. तरी परिस्थितीचा विचार करुन सहानुभूतिपूर्वक विचार करावा अशी मागणी जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
आरोग्य कर्मचारी कार्यक्षेत्रात काम करताना ग्रामीण भागातील लोक त्यांच्यापासून माहिती लपवून ठेवतात. मुंबई, पुणे आदी बाहेरगावातुन आलेल्या रुग्णांना स्वगृही विलगीकरण केले आहे. त्यांची आणि त्यांच्या सहवासीतांची तपासणी करताना ठराविक अंतरावरुन प्रश्न विचारुन माहिती घ्यावी लागते. त्यांच्या शरीराचे तापमान घेता येत नाही आणि घरातील व्यक्ती जी माहिती देतील त्यावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे अनवधनाने कोणती गोष्ट घडल्यास परिस्थितीचा विचार केला जावा असे निवेदना नमुद केले आहे.