रत्नागिरी :- कोकणातील हापूसला ग्राहक आणि योग्य दर मिळवून देण्यासाठी पणन मंडळाने शेतकरी-खरेदीदार यांची ऑनलाईन नोंदणी सुरु केली आहे. त्याला प्रतिसाद मिळत असून सुमारे पावणेदोनशे बागायतदारांनी विक्रीसाठी तयारी दर्शवली आहे. सुमारे 50 हजार डझन आंबा विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती पणनच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. मुंबईसह परिसरातील सुमारे पंधरा जणांनी आंबा खरेदीसाठी नोंदणी केली आहे.
गेल्या वर्षी लांबलेला पाऊस, थंडीचा अभाव यामुळे हापूस आंब्याचे उत्पादन यंदा नेहमीपेक्षा अर्ध्याने कमी झाले आहे. कमी उत्पादनाचा हा मोसम एप्रिलपासून सुरळीत सुरू होईल अशी अटकळ व्यापारी आणि बागायतदार यांनी बांधलेली असतानाच मार्चमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे 25 मार्चपासून टाळेबंदी सुरु झाली. परिणामी आंबा बागायतदारांपुढे ग्राहक शोधण्याचे आव्हान निर्माण झाले. त्यात वाशी, पुणेसारख्या मोठ्या बाजार समित्यांचा कारभार थांबल्यामुळे त्यात भर पडली. यावर मात करण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने थेट आंबा विक्रीसाठी बागायतदारांना परवानगी दिली. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या भागांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पाठविण्यास सुरवात झाली आहे. त्याला चांगला ग्राहकांचा प्रतिसादही मिळत आहे. ग्राहक घर बसल्या आंब्याच्या पेट्यांची मागणी नोंदवत आहेत. कृषी विभागाकडून त्यानुसार ही नोंदणी करून घेतली जात आहे. त्यांच्या मदतीला मुंबईतील कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांनीही मदतीचा हात दिला आहे. आतपर्यंत सुमारे सहा पेटी आंबा रत्नागिरीतून गेला असून अजून दहा हजार पेटीची मागणीही येऊ घातलेली आहे.
कृषी विभागाबरोबरच पणन मंडळानेही यासाठी कंबर कसली असून दोनच दिवसांपुर्वी वेबसाईवर हापूस उत्पादक आणि खरेदीदार यांची नोंदणी सुरु केली. दोन दिवसात पावणेदोशन बागायतदारांनी विक्रीसाठी सज्ज असल्याची नोंदणी केली आहे. हळूहळू त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. येत्या चार दिवसात वाशी बाजार समितीमधील फळबाजार सुरु होण्याची शक्यता आहे. 26 ला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात आंबा मुंबईत विक्रीसाठी जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी कदाचित विक्रीची साखळी सुरळीत झाली तर बागायतदारांना त्याचा फायदा उठवता येऊ शकतो. पणन मंडळाच्या रत्नागिरीतील कार्यालयातून सुमारे अडीच हजार डझनच्या ऑर्डर फक्त दुरध्वनीवरुन स्थानिक बागायतदारांना मिळवून दिल्या आहेत. मुंबई, पुणे, वाकेड, कराड येथून ही मागणी असून काही मोठ्या मॉलमधूनही आंबा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याची तयारी केली आहे.