आता गृहनिर्माण सोसायटीत थेट भाजी विक्री

रत्नागिरी :- शेतकरी गट, कंपन्या आणि वैयक्तिक शेतकरी यांच्या माध्यमातून जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांमध्ये भाजीपाल्याची थेट विक्री करण्यात येणार आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सींग ठेवण्यासाठी आणि बाजारातील गर्दी नियंत्रीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनो विषाणुचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांना घर बसल्या जीवनावश्यक भाजीपाल्याची गैरसोय होवू नये, यासाठी उत्पादक शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, वैयक्तीक शेतकरी यांच्याकडून थेट विक्रीबाबत योजना राबविण्यात येत आहे. सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी, बाजार समितीचे अध्यक्ष संजय आयरे, सचिव किरण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी शेतक-यांकडुन भाजीपाला थेट विक्रीबाबत योजना राबवली जात आहे. त्यांच्या संस्थेची पुरेशा प्रमाणात एकत्रितरित्या मागणी नोंदवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीकडे संपर्क साधावयाचा आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासद व शेतकरी, उत्पादक शेतकरी गट, शेतकरी कंपन्यात सहकार विभाग समन्वयाची भुमिका बजावणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष  व सचिव यांना समन्वयक म्हणुन घोषित करणेत येत असुन त्यांनी सोसायटींमधील सभासदांना आवश्यक भाजीपाला मागणीबाबत समन्वय साधायचा आहे. गृहनिर्माण संस्थेने भाजीपाल्याची एकत्रित मागणी  am_ratnagari@msamb.com किंवा ddr_rtg@rediffmail.com या ई-मेलवर अथवा किरण महाजन 942263683, संजय आयरे 7387606565 या क्रमांकावर नोंदवल्यास त्यांना सोसायटीचे संकुलातही पोहोच करण्याची व्यवस्था केली आहे. या कामासाठी सहकार विभाग व बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या तालुकानिहाय गृहनिर्माण संस्थांमधुन नागरीकांना त्यांच्या सोसायटीच्या एकत्रित मागणीनुसार जीवनावश्यक भाजीपाला पुरवठा सुरळीत होत राहील याकडे लक्ष द्यावयाचे आहे. त्यात हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी केले आहे.
अशी होईल कार्यवाही
ही मागणी नोंदविताना संस्थेचे नाव, पत्ता, संस्थेचे समन्वयक अध्यक्ष व सचिव यांचे नाव व आवश्यक भाजीपाला यांचे तपशिल याची माहीती दयावी. मागणी नोंदविल्यानंतर सहकार विभागाचे व बाजार समितीचे अधिकारी-कर्मचारी संबंधित शेतकरी व कंपनी यांना संपर्क साधतील आणि त्यानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थेला घर पोच भाजीपाला पुरवठा होण्याबाबत कार्यवाही करतील.