पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खबरदारी ; निर्बंध उठवले तरी वॉच राहणारच
रत्नागिरी:- जिल्ह्यातील शेती व मत्स्य व्यवसायावरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. तरी सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. यासंदर्भातही आपण योग्य ती खबरदारी घेवून मार्गदर्शन लवकरच जाहीर करणार येणार आहे, असा दिलासा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिला. मात्र ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, त्या साखरतर आणि राजिवडा भाग सील केल्याने ही दोन्ही बंदर मासेमारीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील शेती व मत्स्य व्यवसायावरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. केंद्राने तसा निर्णय घेतल्यानंतर राज्याने आणि जिल्ह्यानेही त्याची अंमलबजवाणी सुरू केली आहे. मात्र सोशल डिस्टन्सची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तशा सूचना मच्छीमारा सोसायट्यांना देण्यात आल्या आहेत.
त्याची अंमलबजावणी होते की नाही यावर वॉच ठेवण्यात येणार आहे. मच्छीमार्केट देखील सुरू करण्यात येणार आहे. मात्र तिथेही सोशल डिस्टन्स राहावा यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मच्छीमार, शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत सहाय्यक मत्स्य आयुक्त व्ही. एम. भादुले यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने शेती आणि मत्स्य व्यवसायावरील निर्बंध उठविले आहेत. परंतु राजिवडा आणि साखरतर येथे कोरोनाबाधित रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे दोन्ही भाग सील केले आहेत. या सील केलेल्या भागातील मासेमारी सुरू होणार नाही. तो सर्व अधिकारी पोलिस प्रशासनाचा आहे. मात्र राजिवडा आणि साखरतर ही दोन्ही बंदरे मासेमारीसाठी पुढील निर्णय होईपर्यंत बंद राहणार आहेत. त्याचे काटेकोर पालन केले जाणार आहे.