सहा महिन्यांच्या कोरोनाग्रस्त बाळावर उपचारासाठी दहा जणांचे विशेष पथक

रत्नागिरी:- साखरतर येथील सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानंतर या बाळावर उपचार करण्यासाठी एक टीम जिल्हा रुग्णालयामध्ये तयार करण्यात आली असून दोन बाल रोग तज्ञ त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. या बाळावर स्वतंत्र कक्षात उपचार सुरू असून दहा जणांचे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. बाळाच्या आईची पुन्हा नव्याने कोरोना चाचणी करण्याचा निर्णय सिव्हिल प्रशासनाने घेतला आहे. तालुक्यातील साखरतर येथील दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या कुटुंबातीलच सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  साखरतरमध्ये आढळलेल्या पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा तो नातू आहे. साखरतर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. एकाच कुटुंबातील तीनजण कोरोनाबाधित झाले आहेत.
   सहा महिन्यांचे बाळ पॉझिटिव्ह असल्याने जिल्हा रुग्णालयाने बाळाच्या आईलाही कोरोना प्रतिबंधक औषधे सुरु केली आहे. बाळासोबत आईला ठेवणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने आवश्यक उपायोजना केल्या जात आहेत. बाळाच्या आईची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी बाळाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आईची नव्याने कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. ज्यांनी ज्यांनी बाळाला हाताळले आहे त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. साखरतर मध्ये कोरोनाचा संसर्ग कायम राहिल्यामुळे त्या भागात पुन्हा सर्वेक्षण करण्याची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. साखरतरमध्ये तीन रुग्ण आढळल्यानंतर अद्याप पर्यंत या गावात कोरोनाचा संसर्ग कसा पोहचला हे स्पष्ट झालेले नाही.  कोरोना संसर्ग असलेली कोणती व्यक्ती गावात येवून गेली आहे. याचा शोध आरोग्य विभागाला लागलेला नाही.