रत्नागिरी :- हॉटस्पॉट नसलेल्या भागामध्ये जीवनावश्यक वस्तू, मालवाहतुकीला परवानगी दिल्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे मालवाहतुकीसाठी वाहनांना पोलिस किंवा आरटीओंच्या पासची गरज नाही. मात्र त्यांनी वाहनांची कागदपत्र सोबत ठेवावी. चालकाबरोबर क्लिनरला परवानगी आहे. मात्र प्रवासी वाहतुकीस मनाई आहे. मालवाहू रिकाम्या वाहनांना सुद्धा परवानगी आहे. कोणत्याही पासची गरज नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे राज्यासह जिल्ह्यातील मालवाहतूक ठप्प झाली आहे. औद्योगिक, कंपन्या, मत्स्य, आंबा आदींवर त्याचा परिणाम दिसत आहे. मात्र त्याचा कृषी क्षेत्रावरही गंभीर परिणाम झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाढती चणचण पाहता सरकारने मलावाहू, कामगार, गोदामे, तसेच शीतगृहांच्या वापरासाठी सुुधारित आदेश दिले आहेत. हॉटस्पॉट वगळता अन्य भागांमध्ये या सूचनांचे पालन करून जीवनावश्यक व मालवाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसे आदेश नुकतेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.
पहिल्या 21 दिवसाच्या लॉकडाऊमध्ये मालवाहतूकीसाठी पोलिसांकडुन पास दिला जात होता. मात्र मोठ्या प्रमाणात पाससाठी अर्ज आल्याने पोलिस यंत्रणेवर ताण आला. अखेर पोलिसांनी आरटीओं कार्यालयाकडुन पास सुविधा सुरू केली. त्यांच्याकडेही पाससाठी दिवसाला सुमारे 600 अर्ज येऊ लागले. एवढ्या लोकांना तत्काळ पास देणे शक्य नव्हते, मात्र त्यांची गरज होती.
मात्र आता शासनानेच जीवनावश्यक आणि कृषी क्षेत्रावरही वाहतूक बंदीचा गंभीर परिणाम दिसू लागल्याने या वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश आरटीओंना प्राप्त झाले असून त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.