खेड तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन मागे

रत्नागिरी :- खेड मधील कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर खेड तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु दोनच दिवसात निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता आरोग्य खात्यामधील वैद्यकीय अधिकार्‍यांची कमतरता जाणवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सीईओ कान्हूराज बगाटे यांनी सांगितले. खेड अलसुरे येथील होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन चांगलेच हादरले होते. ती व्यक्ती दुबई येथून गावी आली होती. अलसुरे येथून ती खेड शहरात वास्तव्यास आली. होम क्वारंटाईन केलेल्यांवर विशेष लक्ष ठेवण्याची जबाबदारी तालुका आरोग्य विभागाकडे सोपवण्यात आली होती. त्या-त्या विभागातील अंगणवाडी सेविका, आशा यांना ती व्यक्ती घरात आहे किंवा नाही याचा प्रत्येक दिवसाचा अहवाल तालुक्याला कळवायचा होता. या प्रकारे यंत्रणा कार्यान्वित असतानाही अलसुरेतील ती व्यक्ती आजारी पडल्यानंतर एका खासगी वैद्यकीय अधिकार्‍यांकडे उपचारासाठी गेली. सुरवातीला त्यांना कोरोनाची लक्षणे होती; परंतु त्याची माहिती लपवण्यात आली. काही कालावधीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला. या प्रकारानंतर प्रशासनाकडून हलगर्जीपणा केल्याचा ठपका खेड तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांवर ठेवत निलंबनाचे आदेश जिल्हा परिषद सीईओंनी काढले होते.  सध्या राष्ट्रीय आपत्ती असून आरोग्य यंत्रणेवर मोठा भार आहे. नागरिकांकडून तेवढे सहकार्य मिळत नसल्याने प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाली आहे. या परिस्थितीत खेड तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांवर ठपका ठेवू नये असे निवेदन दोन दिवसांपुर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आरोग्य सभापती बाबू म्हाप यांना देण्यात आले होते. त्यांनीही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर मंगळवारी (ता. 14) सीईओंनी निलंबन रद्दचा निर्णय घेतला आहे.