आंबा बागायतदारांना दिलासा; एक्झॉटीक कंपनी सुरू होणार

रत्नागिरी:- बागायतदारांना दिलासा देण्यासाठी आंबा प्रक्रिया करणारी रत्नागिरीतील एक्झॉटीक कंपनी येत्या आठ दिवसात सुरु करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सूचना केल्या आहेत. कंपनीला लागणारा आंबा जिल्हाभरातून गोळा करण्यासाठी कॅनिग विक्रेत्यांना सोशल डिस्टंन्सिंग ठेवून आंबा खरेदीची परवानगी येत्या काही दिवसात जिल्हा प्रशासन देणार आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आंबा बागायतदारांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. यावेळी ना. उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, उपविभागिय कृषी अधिकारी जी. बी. काळे यांच्यासह आंबा बागायतदार प्रदिप सावंत, प्रसन्न पेठे, तुकाराम घवाळी, बावा साळवी, राजू पेडणेकर, कॅनिंग विक्रेते अशोक चव्हाण, साजीद भैय्या आणि 
एक्झॉटीक कंपनीचे श्री. बाहेती उपस्थित होते.
याप्रंसगी बागायतदारांना आपल्या समस्या प्रशासनापुढे मांडल्या. आंबा वाहतुकीसाठी नवीन पास गरज नसल्याचे यावेळी सांगण्यता आले; मात्र त्यातून चार माणसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही गाडीतून आणू नये. ग्राहक मिळत नसल्याने बागायतदारांची पंचाईत झाली आहे. त्यासाठी कॅनिंग कंपनी सुरु झाली तर जागेवरच आंबा विकला जाईल. रत्नागिरीतील एक्झॉटीक कंपनी सर्वात मोठी कॅनिंग कंपनी असून त्यांना प्रतिदिन दोनशे टन आंबा लागतो. ती सुरु करण्याविषयी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. एक्झॉटीक

कंपनीकडूनही लवकरच कंपनी सुरु करु असे सांगितले. आंबा खरेदी करताना दर एकच राहील याची काळजी घ्यावी अशा सुचना सामंत यांनी दिल्या आहेत. कंपनीला आवश्यक साहित्य डबे गुजरात, अहमदाबाद येथून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर गावागावातील आंबा गोळा करण्यासाठी कॅनिंग व्यावसायिकांना स्टॉल लावण्याच्या परवानग्या जिल्हाधिकारी लवकरच देणार आहेत. यामध्ये कोणतीही अडचण आली तर जिल्हाधिकारी किंवा माझ्याशी संपर्क साधा असे सामंत यांनी सांगितले. कृषी विभागाकडून आंबा विक्रीसाठी प्रयत्न सुरु आहेत; मात्र त्यांनी सुरवातीलाच डझनचा दर साडेतीनशे रुपये जाहीर केला होता. त्याचा परिणाम होत असून मागणी असून दर मिळत नाही. अनेक ग्राहकांना चांगल्या दर्जाचा माल बागायतदार देत असलेल्या दरात परवडत आहे, अशी सुचना बागायतदारांनी यावेळी केली. कृषी विभागाने दर जाहीर करु नयेत अशा सुचना यावेळी श्री. सामंत यांनी दिल्या.