20 दिवसात वाहन चालकांना 38 लाखांचा दंड

रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या कालावधीत रत्नागिरीत वाहन चालकांकडून सर्वाधिक वेळा नियम मोडण्याचा जणू रेकॉर्डच नोंदवला गेला आहे. 22 मार्च पासून 20 दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी 10 हजार 885 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. या वाहन चलकांकडून 37 लाख 62 हजार 200 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला असून इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठया प्रमाणावर दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.   राज्यासह जिल्ह्यावरही कोरोनाचे संकट घोंघावत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी करण्यात आली. मात्र या संचारबंदीच्या कालावधीतदेखील लोक वाहन घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसली. अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेने कारवाईची जोरदार मोहीम राबवली.  20 दिवसाच्या कालावधीत वाहतूक शाखेने जवळपास 38 लाखांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई विना हेल्मेट फिरणाऱ्या वाहन चालकांवर करण्यात आली आहे. अशा 4 हजार 924 वाहन चालकांकडून 24 लाख 62 हजार रक्कम वसूल करण्यात आली आहे. सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या 441 चालकांना 88 हजार 200, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या 30 जणांकडून 6000, इन्शुरन्स नसणाऱ्या 23 जणांकडून 30 हजार 700, लायसन्स नसणाऱ्या 157 वाहन चालकांना 78 हजार 500, फॅन्सी नंबर वापरणाऱ्या 247 जणांना 54 हजार 200, अधिकृत कागदपत्र नसणाऱ्या 2 हजार 146 जणांना 54 हजार 200, ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या 58 जणांना 11 हजार 600 आणि इतर मध्ये 2 हजार 595 जणांना 5 लाख 36 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.